पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेली चौथी विशेष फेरी बुधवारी संपली आहे. या फेरीतून १ हजार ९१० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी घेतली जाणार आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.राज्य मंडळाच्या मार्च २०१६ च्या परीक्षेत नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व एटीकेटीची संधी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे चौथी विशेष फेरी घेण्यात आली. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २ हजार ३३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश आॅनलाईन पध्दतीने निश्चित करण्यात आले होते. त्यातील १ हजार ९१० विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांमध्ये जावून प्रवेश घेतला आहे. मात्र, प्रवेश निश्चित झालेला असतानाही ४१९ विद्यार्थ्यांनी प्रवेशास प्रतिसाद दिला नाही.
अकरावीत १,९१० विद्यार्थ्यांचे प्रवेश
By admin | Published: September 15, 2016 1:47 AM