पुणे :पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी यंदाही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, येत्या सोमवारपासून (दि. ३०) विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला नसला तरी विद्यार्थी व पालकांनी अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दरवर्षी सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करतात त्यातील सुमारे ७० ते ७५ हजार विद्यार्थी प्रत्यक्षात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेतात.
सोमवारपासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करून ऑनलाईन अर्जात अचूक वैयक्तिक माहिती भरावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि त्यांनी भरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या पसंतीक्रमानुसार प्रवेश दिले जातात. ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याचा विद्यार्थ्यांना सराव करता यावा, यासाठी शिक्षण विभागाने २३ ते २७ मे या कालावधीत लिंक ओपन करून दिली होती, मात्र फार कमी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला.
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरून घेतले जाते, तर दुसऱ्या भागात कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले जातात. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरण्याची संधी उपलब्ध करून दिली.