पुणे :दहावीचा निकाल जाहीर हाेऊन पंधरवडा उलटला तरी अजून त्यांची अकरावीची प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर झालेला नाही. या बाेर्डाचा निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीची प्रवेशाची पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेता यावा हा उद्देश त्यामागे आहे.
दहावीचा निकाल १७ जून राेजी जाहीर झाला. मात्र, अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी शिक्षण विभागाने मे महिन्यात अकरावीची प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास विद्यार्थ्यांना संधी दिली आहे. त्यानुसार पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण, नाशिक, अमरावती, नागपूर या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरला आहे. मात्र दहावीचा निकाल जाहीर करून जवळपास पंधरा दिवस झाले तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. या प्रक्रियेकडे विद्यार्थी व पालक डाेळे लावून बसले आहेत.
दरवर्षी सीबीएसई बाेर्डाचा निकाल राज्य मंडळाच्या आधी म्हणजे मे महिन्यात जाहीर हाेत असताे. मात्र, यंदा प्रथमच राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाला तरी अन्य शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. दरवर्षी अकरावीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण प्रवेशांपैकी पाच टक्के विद्यार्थी सीबीएसईचे असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शासनाने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईचा निकाल जाहीर होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू झालेला नाही. मात्र, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लागू नसलेल्या ग्रामीण भागातील अकरावीचे प्रवेश मात्र, सुरू झाले आहेत. दरम्यान, ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक आणि प्रवेश फेरी जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे मिळवून ठेवावीत असे अवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतही देण्यात आली आहे.