संस्थाचालकांची मागणी : प्रवेश प्रक्रिया दोनदा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवडमधील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते. मात्र, यंदा सीईटी गुणांच्या आधारे व त्यानंतर उर्वरीत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला दोनदा प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेला उशीर होत असल्याने अकरावी प्रवेशाची जबाबदारी प्रत्येक महाविद्यालयाकडे देण्याची मागणी संस्थाचालक करत आहेत.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरांव्यतिरीक्त उर्वरीत जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यातच गेल्या वर्षी पुण्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवूनही तब्बल ३५ हजार जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे दहावी उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश मिळणार आहे.
जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १ लाख २९ हजार ९६२ आहे. ग्रामीण भाग वगळता केवळ शहरी भागात अकरावी प्रवेशासाठी १ लाख ७ हजार २१५ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली तरी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
महाविद्यालयांची संख्या - ३०४
प्रवेश क्षमता - १,०७,२१५
मागील वर्षीचे प्रवेश - ७१,७२२
रिक्त राहिलेल्या जागा - ३५,४९३
चौकट
“पुणे-मुंबई सारख्या शहरांसाठी शिक्षण विभागाकडून राबविली जाणारी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळखाऊ आहे. विद्यार्थ्यांना तीन ते चार महिने प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागते. काही वेळा पिंपरीतील मुलाला वाघोलीत प्रवेश मिळतो. उशिरा प्रवेश झाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो. त्यामुळे शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी महाविद्यालयांकडे द्यावी.”
अॅड. एस. के. जैन, अध्यक्ष, नियामक मंडळ, शि. प्र. मंडळी
--------------------
अकरावी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेतली जाणार असून येत्या सोमवारपासून (दि. १९) प्रक्रियेस सुरूवात होणार आहे. येत्या २१ ऑगस्टपर्यंत सीईटी घेण्याचे नियोजन असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी शुक्रवारी (दि.१६) पत्रकार परिषदेत सांगितले.
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार असल्याचे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांवर सीईटी परीक्षा अवलंबून असेल जाहीर करण्यात आले. मात्र, निकाल जाहीर झाला, प्रवेश प्रक्रिया केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम होता. परंतु, येत्या सोमवारपासून या प्रक्रियेस सुरुवात केली जाईल. सीईटी परीक्षा ऐच्छिक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
सीईटी परीक्षेसाठी अभ्यास साहित्य दिले जाणार नाही. परंतु, कोणत्या घटकांवर परीक्षा घेतली जाईल, याची माहिती मंडळातर्फे दिली जाईल. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी सुमारे १७० रुपये शुल्क आकारले जाईल. राज्य मंडळाने सीईटी परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक तयारी केली आहे. त्यामुळे येत्या २१ ऑगस्टपर्यंत सीईटी परीक्षा घेतली जाण्याची शक्यता, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.