पुणे : पुणे, पिंपरी, चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आता तिसरी विशेष फेरी साेमवार (दि. १९)पासून राबविली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना १९ ते २४ सप्टेंबरच्या दरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन भरणे व प्रवेश निश्चित करणे आदी प्रक्रिया करता येणार आहे.
या तिसऱ्या विशेष फेरीची निवड यादी २५ सप्टेंबरला जाहीर होईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने दिली.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आत्तापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तर दाेन विशेष फेरी अशा एकूण पाच फेऱ्या राबविण्यात आल्या. अद्याप तब्बल ४० हजार जागा रिक्त आहेत. गेल्यावेळी विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने, तसेच राज्य मंडळाने घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण आणि एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी राबविली हाेती.
तिसऱ्या फेरीची निवड यादी २५ सप्टेंबरला जाहीर हाेणार असून, त्यापूर्वी २३ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय निवड यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे, प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे, प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रवेश लाॅगिनमध्ये दर्शविणे, फेरीचे कटऑफ पाेर्टलवर दर्शविणे व महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करणे आदी प्रक्रिया पार पडेल, तसेच २४ सप्टेंबरच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाइन प्रवेश निश्चित करणे, रद्द करणे व नाकारता येईल.
विशेष फेरीमध्ये दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. त्यांनी ६ विषयांमध्ये मिळालेल्या ६०० पैकी गुण नाेंदवावेत. यापूर्वी अर्ज भरलेले आणि प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल. विशेष फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्याने नव्याने संमती देणे आवश्यक असल्याने, सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जाचा भाग दोन अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम सुधारित करून, अर्ज पुन्हा लॉक करणे गरजेचे आहे.
ही फेरी शेवटची :
अकरावी प्रवेशाची ही शेवटची फेरी असणार आहे. यानंतर, एफसीएफएस फेरी हाेणार नाही, असे संचालनालयाचे जारी केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले आहे.