पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सोमवारपासून (दि. २३) सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र, प्रत्यक्षात आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी काहीशी वाट पाहावी लागणार आहे. पुढील महिन्यात अर्ज भरण्याची लिंक सुरू केली जाणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया येत्या शैक्षणिक वर्षातही आॅनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत ही प्रक्रिया राबविली जाईल. मागील महिन्यात दहावीची परीक्षा संपली असून, विद्यार्थी व पालकांना इयत्ता अकरावीचे वेध लागले आहेत. दहावीच्या निकाल लागण्यास खुप कालावधी असला तरी प्रवेश समितीकडून एप्रिल किंवा मे महिन्यापासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. त्यानुसार सोमवारपासून उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना झोन केंद्रानुसार माहिती पुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहून माहिती पुस्तिका दिल्या जातील. त्यानंतर शाळांनी दि. २३ ते २७ एप्रिल दरम्यान विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका मिळतील. विद्यार्थ्यांना १५० रुपये शुल्क भरून माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली जाईल.प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी समितीतर्फे शुक्रवारी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात मुख्याध्यापक, प्राचार्य, अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली. माहिती पुस्तिकांचे वितरण, त्याचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. माहिती पुस्तिका मराठी व इंग्रजी या भाषेत असेल. शाखानिहाय महाविद्यालयांची नावे, प्रवेश क्षमता, शुल्क, आरक्षण, मागील वर्षीचे कटआॅफ यासंह आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड याची माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. प्रवेशाची लिंक सुरू झाल्यानंतर या आय डी चा वापर करून अर्ज भरता येणार आहे. ही लिंक मे महिन्यामध्ये सुरू केली जाईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.
अकरावीच्या माहिती पुस्तिका सोमवारपासून मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 5:33 AM