बारामती : राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीने शुक्रवारी १७ मार्च रोजी पुणेजिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शन साठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून २० हजार कर्मचारी या मोर्चास उपस्थित राहतील अशी माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिले आहे.
राज्यभर १४ मार्चपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामध्ये राज्यातील सर्व संवर्गातील कर्मचारी संघटना समाविष्ट आहेत. शिक्षक संघटनांनी देखील या मोर्चात सक्रिय सहभाग घेतल्याने मोर्चाची तीव्रता वाढली आहे. राज्यभरातील १८ लाख कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतल्याने शाळा, महाविद्यालये तसेच सर्व सरकारी कार्यालये ओस पडली आहेत. संपाचे दोन दिवस उलटूनही राज्य शासनाकडून सकारात्मक चर्चेची चिन्ह दिसत नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य सेविका यांनी संपात उडी घेतल्याने आरोग्यसेवा ठप्प झाली आहे. शासकीय कामकाज थांबल्याने संपावर लवकर तोडगा काढण्याची मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे. जिल्हास्तरावर होत असणाऱ्या मोर्चाना प्रचंड गर्दी होत असल्याने सरकार वरील दबाव वाढणार आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेसमोर सर्व कर्मचारी जमणार असून ठीक ११ वाजता मोर्चा सुरु होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेहून विभागीय आयुक्त कार्यालय मार्गे सेंट्रल बिल्डिंग व पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाईल. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता होईल ,अशी माहिती शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.