पुणे : एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पुण्यातील विश्रामबागवाडा पाेलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करताना पाेलिसांनी नाेयडा येथे हॅनी बाबू एम टी ( वय 45) यांच्या घराची झडती घेतली. यामध्ये घरातून काही इलेक्ट्राॅनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान या सर्च ऑपरेशनमध्ये काेणालाही अटक करण्यात आली नाही.
एल्गार परिषदेत माओवाद्यांचा संबंध असल्याच्या आराेप करत पुण्यातील विश्रामबाग पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. याप्रकरणी पाेलिसांनी सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन , अरुण फरेरा, वर वरा राव, महेश राऊत, व्हार्नोन गोन्सालविस, सुधा भारद्वाज, रोना विल्सन यांना अटक केली आहे. पुणे सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे.
पुणे पाेलिसांच्या एका टीमने नाेयडा येथील हॅनी बाबू एम टी यांच्या घरी झडती घेतली. यासाठी उत्तर प्रदेश पाेलिसांची मदत घेण्यात आली. या तपासणीत पाेलिसांनी काही इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त केली आहेत. या संपूर्ण कारवाईचे व्हिडीओ रेकाॅर्डिंग करण्यात आले आहे. तसेच या तपासणीचे कारण देखील बाबू यांना सांगण्यात आले आहे. जप्त केलेल्या वस्तूंची माहितीची प्रत देखील त्यांना देण्यात आली. पुण्याच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पाेलीस आयुक्त शिवाजी पवार आणि सायबर एक्सपर्ट यांनी ही तपासणी माेहीम राबविली.