पुणे : धुळ्यातील डॉक्टरवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांनी एकजूट केली आहे. स्वरक्षणासाठी एल्गार पुकारत असे प्रकार तातडीने रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन शासनाला करण्यात आले आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी करीत तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी डॉक्टरांकडून निषेध रॅली काढण्यात आल्या. अनेक ठिकाणी दवाखाने, हॉस्पिटल्स बंद ठेवण्यात आली होती.धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रोहन म्हामुनकर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी हल्ला केला. त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. इंदापूर मेडिकल असोसिएशन शाखेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत चोवीस तास पोलीस बंदोबस्त ठेवावा, या व इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे सादर करण्यात आले आहे. मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर मगर, सचिव डॉ. मिलिंद खाडे, डॉ. राम आरणकर, डॉ. श्रेणीक शहा, डॉ. दत्ता गार्डे, डॉ. सागर दोशी, डॉ. रियाज पठाण व इतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार श्रीकांत पाटील यांची भेट घेतली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नीरा-लोणंद शाखेतर्फे निषेध फेरी काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता पालखीतळापासून निषेध फेरीला सुरुवात करण्यात आली. बुवासाहेब चौक, बारामती रस्ता, अहिल्याबाई होळकर चौक, शिवाजी महाराज चौक, ग्रामपंचायत कार्यालयामार्गे पंढरपूर रस्त्यावरून नीरा पोलीस दूरक्षेत्रात पोलिसांना निवेदन देण्यात आले. या वेळी लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, उपाध्यक्ष डॉ. अविनाश शेळके, नीरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राम रणनवरे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र जैन, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजीव गांधी, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, नीरेच्या सरपंच दिव्या पवार, उपसरपंच बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते. राजगुरुनगर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने आज दवाखाने बंद ठेवून निषेध करण्यात आला. या संदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.दिलीप बांबळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व डॉक्टरांनी उस्फुर्तपणे या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि दोषींवर कडक कारवाई होण्याची मागणी केली. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यासाठी दोषींवर डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्टनुसार कारवाई व्हावी म्हणजे इतरांवरही कायद्याचा वचक राहील असे डॉ. बांबळे यांनी यावेळी सांगितले. आज धरणे आंदोलनबारामती : धुळे येथील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखांनी देशभर तसेच राज्यात बंद किंवा मूक मोर्चे आयोजित केले आहेत. विविध ठिकाणी मोर्चाद्वारे या घटनेचा निषेध नोंदविला आहे. त्या घटनेचा निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर, शिकाऊ डॉक्टर यांनी मुंबईत आझाद मैदानावर शुक्रवारी (दि. १७) आयएमएचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, सचिव डॉ. पार्थिव संघवी, नियोजन समितीचे डॉ. अनिल पाचनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
डॉक्टरांचा स्वरक्षणासाठी एल्गार
By admin | Published: March 17, 2017 2:06 AM