पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, रविवार पेठेसह शहरातील सर्व बाजारपेठा १७ ते १९ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणेने (व्यापारी महासंघ) सोमवारी (दि. १६) घेतला. औषध, अन्नधान्य-भाजीपाल्याची दुकाने वगळता शहरातील सोने, कपडे, इलेक्ट्रॉनिक अशा सर्वच बाजारपेठा बंद राहतील. नारायण पेठेतील सराफ असोसिएशनच्या सभागृहामधे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, वरिष्ठ उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष रतन किराड, सचिव महेंद्र पितळिया, सहसचिव जयंत शेटे, अभय गाडगीळ या वेळी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. नागरिकांच्या हिताकरिता सराफ, होजिअरी व कापड, ऑटोमोबाईल, प्लायवूड आणि टिंबर मार्केट, स्टेनलेस स्टील, नॉन फेरस मेटल, पेपर, प्लॅस्टिक, इलेक्ट्रिक अॅण्ड इलेक्ट्रॉनिक, मशिनरी आणि वेल्डिंग, संगणक, खेळण्यांची दुकाने, घड्याळे, सायकल दुकानदार, रसायन, कर्वे रस्ता, रविवार पेठ व्यापारी संघटना यामधे सहभागी होणार आहेत. विविध प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या ८२ संघटना महासंघाच्या सभासद आहेत. औषध आणि जीवनावश्यक वस्तू वगळता शहरातील सुमारे ४० हजार दुकानदार तीन दिवस दुकाने बंद ठेवणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव पितळिया यांनी दिली. यापूर्वी केवळ स्थानिक संस्था कर (एलबीटी) आंदोलनाच्या कालावधीत सर्व दुकाने बंद होती. शहरात २००९मध्ये स्वाइन फ्लूचा उद्रेक झाला, त्या वेळीदेखील सराफ व्यवसायिकांनीच दुकाने बंद ठेवली होती. इतर बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या, असे पितळिया यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर बाजारपेठा बंद राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी, तेल, साखर, डाळी या बाजारपेठा सुरू राहणार असल्याचे दि पूना मर्चंट्स चेंबर असोसिएशनचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. ०००जीवनावश्यक असल्याने दुधाचे संकलन आणि वितरण सुरळीत सुरू आहे. दुधाचा कोणताही तुटवडा नाही. तसेच, दूध आणि किराणा दुकाने सुरू राहणार आहेत.-श्रीकृष्ण चितळे, दूध आणि मिठाई व्यावसायिक ०००