पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेतील सीसॅटचा पेपर केवळ पात्र करावा. या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पात्रता गुण मिळविण्याची अट ठेवावी. पूर्व परीक्षेची अंतिम गुणपत्रिका जाहीर करताना या पेपरचे गुण ग्राह्य धरले जाऊ नयेत, अशी मागणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केली.
पूर्व परीक्षेला सामान्य अध्ययन (जीएस) आणि सीसॅट हे दोन पेपर देणे आवश्यक असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत देखील सीसॅट पेपर द्यावा लागतो. त्याच धर्तीवर एमपीएससीने सीसॅट पेपर आणला. उमेदवारांचे नुकसान होऊ नये तसेच अधिक संधी मिळावी, यासाठी एमपीएससीने देखील सीसॅट पेपर पात्र करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
हा पेपर पात्र न केल्यामुळे एका विशेष शाखेतील (इंजिनिअर, डॉक्टर, मॅनेजमेंट इत्यादी) उमेदवारांना फायदा होत आहे. तसेच कला, वाणिज्य, कृषी या शाखेतील उमेदवारांचे नुकसान होत आहे. या पेपरबाबत राज्यभरात व्होटिंग पोलच्या माध्यमातून ६७ टक्के उमेदवारांनी हा पेपर पात्र करावा, या बाजूने मत नोंदविले आहे.
चौकट
सीसॅट पेपरसाठी यूपीएससीने ‘अरुण निगवेकर’ व ‘अरविंद कुमार वर्मा’ या दोन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीने हा पेपर ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी नुकसानकारक आहे. कलम १४ च्या समानता तत्त्वाचे उल्लंघन होत असल्याचा समित्यांनी जो अभिप्राय दिला होता, त्या निकषावर २०१५ मध्ये यूपीएससीने हा पेपर केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला. मात्र एमपीएससीने अद्यापही हा निर्णय घेतला नाही.
कोट
केवळ सीसॅटमुळे अधिकारी होण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे. स्पर्धा परीक्षा ही समान पातळीवर झाली पाहिजे, असे सर्वांचे मत आहे.
- महेश बडे, प्रमुख, एमपीएसी स्टुडन्ट राईट्स
यूपीएससीने सीसॅट पेपरमध्ये ६६ गुणांना पात्रता ठरवली आहे. त्यामुळे जीएसच्या पेपरमध्ये मिळाल्या गुणांवर निवड केली जाते. जीएसमध्ये अपेक्षित गुण मिळूनही मुख्य परीक्षेला मुकावे लागले होते.
- नीलेश डावखरे, परीक्षार्थी
एमपीएससीच्या उमेदवारांनी देखील आंदोलने केली आहेत. आंदोलन, न्यायालयीन लढाई यामुळे खूप वेळ वाया जात आहे. किमान याचा विचार करून तरी जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना संधी मिळावी. म्हणून तरी निर्णय घेण्यात यावा.
- सूरज गीते, परीक्षार्थी