भोर : भोर शहरातील नवी आळी येथील एच प्रकार मालमत्ताधारकांच्या (हाऊसहोल्ड प्रॉपर्टी) बाबतच्या मागील अनेक वर्षांपासून बांधकाम परवाना, होम लोन व वारसनोंद हे प्रलंबित प्रश्न सुटणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. भोर नगरपलिका हद्दीतील नवी आळी येथील एक प्रकारे मालमत्तेसंबंधी अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे बैठक घेऊन शहरातील नवीआळी व इतर ठिकाणच्या मालमत्ताधारकांच्या अडचणी दूर करण्याबाबत मागणी केली होती.
यावेळी महसूल तहसीलदार प्रल्हाद हिरामणी, तहसीलदार अजित पाटील, गटनेते सचिन हर्णसकर, शाखा अभियंता संजीव सोनवणे, तालुका भूमिअभिलेख उपअधीक्षक डॉ. कोरे, संजय खोकले, संतोष केळकर, अशोक जाधव, राजू नाझिरकर, सतीश रोमण, श्री. गांधी व नागरिक उपस्थित होते. यावेळी एच प्रकार मालमत्ताधारकांच्या वारसनोंदी करण्यात येणार असून नवी आळीतील एच प्रकार मालमत्ताधारक स्थानिक रहिवाशांना बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. स्थानिकांना बँकांकडून अर्थसाह्य घेण्याकरिता तालुका भूमिअभिलेख कार्यालयाकडून ना-हरकत दाखला देण्यात येणार आहे. मालमत्ताधारक स्थानिक रहिवाशांची मालकी हक्काची नोंद करण्यात येणार असून भोर शहरातील एच प्रकार रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार आहेत. त्यामुळे मालमत्तेबाबतच्या अडचणी कायमच्या सुटणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.म्हणून नवी आळी नाव दिले...नवीन वसाहत स्थापन केली म्हणून नवी आळी नाव दिले. भोर शहरात १९२० मध्ये शासनाने ४३ प्रॉपर्टी भाडेतत्त्वावर देऊन नवीन आळी किंवा वसाहत बसवण्यात आली, म्हणून त्याला नवी आळी नाव देण्यात आले. मात्र, ७० ते ८० वर्षांपासून येथील प्रश्न प्रलंबित होते, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, आमदार संग्राम थोपटे यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याने नागरिक आनंद व्यक्त करीत असल्याचे नवी आळीतील रहिवासी माजी नगराध्यक्ष व गटनेते सचिन हर्णसकर व सतीश रोमण यांनी सांगितले.