नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये दिनांक ०१/०४/२०१५ ते १८/१२/२०१५ या कालावधीमध्ये ५० लाख ८४ हजार ३४३ रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार आणि शासकीय निधीचा वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भात जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किसन बबन मोरे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ४०६ , ४०९ , ४२० , ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
विस्तार अधिकारी किसन बबन मोरे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार: नारायणगाव ग्रामपंचायतची सखोल दप्तर तपासणी करण्याचे आदेश तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जयश्री बेनके आणि किसन मोरे यांनी ग्रामपंचायतीच्या दप्तरची तपासणी केली होती. या तपासणीत रेखांकित धनादेशाने देयके अदा न करता रोखीने २ लाख ३३ हजार अदा केले. जमा रकमेतून परस्पर व दरपत्रका–निवेदाशिवाय ५ लाख ३१ हजार ८४२ रु. ची खरेदी केली. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मर्यादेपेक्षा ४५ हजार ४१२ रु. जादा खर्च केले. प्रमाणाकाशिवाय ३ लाख ७ हजार ९९० रु. ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी जास्त खर्च केला. ई-निविदा कार्यप्रणाली न अवलंबिता ३५ लाख ३६ हजार २६ रुपये साहित्य खरेदी केली असे एकूण ५० लाख ८४ हजार ३४३ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार आणि शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा ठपका तत्कालीन सरंपच ज्योती प्रवीण दिवटे व तत्कालीन जयश्री सुभाष म्हेत्रे या दोन महिला सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र गेनभाऊ खराडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.