पुणे : पंतप्रधान स्पर्धेमधून हटविण्यासाठी नितीन गडकरी यांच्या चारित्र्यहननाच्या माध्यमातून खच्चीकरण केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून भाजपमधील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घौडदौड अडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्ण बहुमतापेक्षा अधिक संख्येने आमदारांना निवडून दिल्यानंतर सरकार न बनविण्याचे षडयंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले असा आरोप अखिल भारतीय ब्राहमण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केला आहे.
कुलकर्णी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपला सत्तेच्या दारापर्यंत पोहोचविले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्री पदाचा त्याग करुन कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरविल्यानंतर भाजपमधील वरिष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरून फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यात आले आहे. भाजपमध्ये एकानंतर एक अशा ब्राहमण नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चालले असल्याचे दिसत आहे. या घटनेचा अखिल भारतीय ब्राहमण महासंघाने निषेध व्यक्त केला आहे.
...हा फडणवीसांचा अपमान
मुख्यमंत्री पद गुण पाहून द्यायचे का जात पाहूनअसा सवाल ब्राहमण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. पुन्हा एकदा केवळ ब्राहमण मुख्यमंत्री नको म्हणून जर त्यांना संधी नाकारली असेल तर भाजप सुद्धा जातीय राजकारण करतो हे सिद्ध झाले आहे. मी सरकार मध्ये नसणार असे जाहीर पणे सांगितल्यानंतरही त्यांना कालच शपथ घेण्याची सक्ती करून, जाहीर आदेश देऊन भाजपने देवेंद्रजी यांचा अपमानच केला आहे. हे सरकार दिल्लीच्या व्हेंटिलेटरवरच राहील हे पहिल्याच दिवशी राज्याला दाखवून दिले असल्याचे दवे यांनी सांगितले.