सांगवी : पुण्यावरून हैद्राबादला निघालेले भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्याने खांडज गावातील शेतात उतरवले आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
खांडज गावाच्या शिवारात हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतामध्ये इंडियन एअर फोर्सचे चेतक हेलिकॅप्टर इमर्जन्सी लँड करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दुरुस्ती झाल्यानंतर सदरचे हेलिकॉप्टर सोलापूर करिता रवाना होणार असल्याची माहिती माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. यामध्ये तीन पुरुष तर एक महिला प्रवासी प्रवास करत होते. इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर कोणालाही कसलीही इजा झाली नाही. तर घटनास्थळी माळेगाव पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.
बारामती तालुक्यातील खांडज गावात आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान अचानकपणे हेलिकॉप्टर उतरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे या ठिकाणी नक्की काय झाले याची माहिती थोड्या वेळ लोकांना मिळाली नसल्याने अफवा पसरल्या होत्या. समोर आलेल्या माहितीनुसार हे वायुदलाचे हेलिकॉप्टर असून खांडस गावातील शेतात हेलिकॉप्टर उतरल्यानंतर माळेगाव पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त पुरवला आहे. वायुदलाचे अधिकारीही या ठिकाणी पोहचले आहेत.