पुणे : बी.व्ही.जी. व महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ यांच्या माध्यमातून गणेशोत्सव २०२३ मध्ये २३ रुग्णवाहिका सज्ज करयात आल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून २८ सप्टेंबर पर्यंत ३९५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ३ अत्यव्यस्थ रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा देऊन त्याचा जीव वाचवला असल्याची माहीती जिल्हा व्यवस्थापक डाॅ. प्रियांक जावळे यांनी दिली.
ह्या रुग्णवाहिका गणेश विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी लोकांना चक्कर येणे, छातीत दुखणे, पडणे ,किरकोळ दुखापती होणे अशा प्रकारच्या समस्या पाहायला मिळाल्या. या रुग्णवाहिकेत एक प्रशिक्षित डॉक्टर व प्रशिक्षित चालक २४ तास उपलब्ध असतात.
डायल 108 ने मंगळवार पेठेतील 21 वर्षीय भावना चंद्रशेखर चंकलवार यांना नारायण पेठ पोलीस चौकीजवळ हायपाेग्लायसेमिया झाल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. ही रुग्णवाहिका वेळेवर पोहचून त्यांना उपचार दिले. तसेच त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे त्यांचा या कठीण प्रसंगातून जीव वाचला.
तसेच, विजय टॉकीज, लक्ष्मी रोड येथील 27 वर्षीय ऐश्वर्या दिलीप मेहता यांना हालचाल करता येत नव्हते व त्यांना तीव्र वेदना होत होत्या. त्यांना फीमर फ्रॅक्चरचे तात्पुरते निदान झाले. त्यांना डायल 108 च्या डॉक्टरांनी त्वरीत उपचार देऊन त्यांना पूना हॉस्पिटलला पुढील उपचारासाठी हलवले.
पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या 9 वर्षांच्या कालावधीत, डायल १०८ ने जवळपास 823 आपत्कालीन रुग्णांना दिली असून वैद्यकीय पथकांनी तब्बल 3 हजार 639 रुग्णांना घटनास्थळी उपचार दिले आहेत.
१०८ ही एक प्रभावी व विश्वसनीय डायल सेवा
“महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा गेल्या १० वर्षांपासून गणेश विसर्जनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन रुग्णाना तातडीची वैद्यकीय सेवा बजावत आहे. ही एक प्रभावी व विश्वसनीय सेवा डायल १०८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून गरजेच्या वेळी उपलब्ध करून घेता येते” - डॉ. प्रियांक जावळे, जिल्हा व्यवस्थापक पुणे