Baramati Lok Sabha ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा हायव्होल्टेज सामना रंगत आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मागील तीन टर्म खासदार म्हणून अनुभवी उमेदवार अशी ओळख आणि जोडीला शरद पवार यांच्याप्रती असलेल्या सहानुभूतीमुळे निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात होतं. मात्र, प्रचार जसजसा पुढे जात गेला, तसा सुनेत्रा पवार यांनी 'टॉप गिअर' टाकल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारातील काही महत्त्वाच्या फॅक्टर्समुळे ही लढत रंगतदार झाली आहे.
सहानुभूती Vs. विकास
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बारामतीत शरद पवार यांच्याप्रती असलेल्या सहानुभूतीमुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं बोललं जात होतं. मात्र गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या आणि पक्षसंघटनेत झोकून देऊन काम करत असलेल्या अजित पवारांनी ही परिस्थिती ओळखली आणि प्रभावीपणे आपले मुद्दे मांडण्यास सुरुवात केली. बारामतीची निवडणूक भावनिक आधारावर न होता विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवी, अशी भूमिका अजित पवारांनी अगदी सुरुवातीपासूनच मांडली. तर दुसरीकडे, मी निवडून आल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला कसा हातभार लावेन, हे सुनेत्रा पवार यादेखील ठामपणे जाहीर सभांमधून मांडू लागल्या. परिणामी या निवडणुकीचा केंद्रबिंदू हळूहळू भावनिकतेकडून विकासाच्या मुद्द्याकडे सरकण्यास मदत झाल्याचं निरीक्षण राजकीय जाणकार आता नोंदवू लागले आहेत.
सुप्रिया सुळे Vs अजित पवार
शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि पुतणे अजित पवार यांच्याकडे सुरुवातीपासून पाहिलं जातं. शरद पवार यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून स्वत:ला वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचं नेतृत्व आणखी ठळकपणे लोकांसमोर आलं. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकसंघ होता, तोपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचंही नेतृत्व मान्य केलं होतं. मात्र संघटनेतील पहिल्या फळीतील नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम हे प्रामुख्याने अजित पवारांच्या माध्यमातूनच होत होतं. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर बहुसंख्य नेते आणि कार्यकर्ते अजित पवारांसोबत राहिल्याचं पाहायला मिळतं. बारामती लोकसभा मतदारसंघातही असंच चित्र आहे. उद्याच्या काळात आपल्या एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर आपल्याला अजित पवारांकडेच जावं लागेल, अशी काहीशी भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली आहे. याचा फायदा बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे.
सुनेत्रा पवारांची जमेची बाजू
अजित पवारांच्या पत्नी एवढीच सुनेत्रा पवारांची ओळख नाही, तर सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात प्रत्यक्ष पहिल्यांदाच उतरल्या आहेत. मात्र, गेल्या अनेक निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा बारामतीत त्यांनीच यशस्वीपणे सांभाळली. अगदी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची जबाबदारीही त्यांनी पेलली आहे. कारण, बारामती तालुका आणि आसपासच्या परिसरात त्या गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय असल्यानं त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. अजित पवार हे विविध मंत्रिपदांच्या माध्यमातून राज्याचं नेतृत्व करत असल्याने बारामती परिसरातील विविध विकासकामांसाठी सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पवार कुटुंबाचं गाव अशी ओळख असणाऱ्या काटेवाडी इथंही ग्रामस्वच्छतेपासून विविध उपक्रमांचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी हजारो महिलांनाही रोजगार दिला आहे. या अशा उपक्रमांचा सुनेत्रा पवार यांना यंदाच्या निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात विकास हा मुद्दा ठळकपणे मांडला जाऊ लागल्याने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरही खडतर आव्हान निर्माण झालं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी आणखी काही दिवस बाकी असल्याने मतदारसंघात पुढील तीन ते चार दिवसांत नक्की कशा घडामोडी घडतात, त्यावरच दोन्ही उमदेवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.