बारामती : इंदापूरमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. परिणामी संपर्कातील बाधितांचे प्रमाण वाढल्यामुळे मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येऊ लागले आहे. सध्या इंदापूरचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.११ टक्के आहे. तर मृत्यूदर २.४७ एवढा आहे.
काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर असल्यामुळे बाधितांच्या संपर्कातील येणा-यांची तातडीने चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या इंदापूरमध्ये ४६८ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत इंदापूरमध्ये मागील दीड वर्षांपासून १९ हजार ४१५ कोरोनाबाधित अाढळून आले आहेत. यापैकी १८ हजार ४६७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ४८० रुग्णांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. इंदापूर शहर व तालुक्यात प्रशासनाच्या वतीने अँटिजन चाचणी मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी निमगाव केतकीमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर याठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने जवळपास २ हजाराच्या वर नागरिकांच्या अँटिजन तपासणी करण्यात आल्या होत्या. तालुक्यातील निमगाव केतकी, लोणी देवकर, कळस, शेळगाव, वडापुरी, निमसाखर, अकोले, मदनवाडी आदी गावांमध्ये रुग्णसंख्या १० च्या पुढे आहे. त्यामुळे ही गाव या आठवड्यामध्ये हॉटस्पॉट ठरली आहेत. तर बावडा, चांडगाव, लासुर्णे, काटी, कळंब, पिंपरी, कळाशी, रूई गावांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या ७ च्या पुढे आहे. या गावांमध्ये अँटिजन तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, मागील महिन्यामध्ये विकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात आला. परिणामी बाजारपेठ नव्या जोमाने सुरू झाली आहे. मात्र वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे व कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
-------------------------------
तालुक्यातील रुग्ण स्थिती (मंगळवार दि. ३१पर्यंत)
हाय रिस्क : १७२
लो रिस्क : ३१६
होम आयसोलेशन : १४४
अत्यावस्थ : ०६
------------------
उपलब्ध बेड...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल इंदापूर - ११६
भिगवण सीसीसी - २६
वालचंदनगर सीसीसी - ४७
बावडा सीसीसी - ३०
व्हीपी कॉलेज इंदापूर सीसीसी - २००
इंदापूर डीसीएचसी - ५७
निमगाव केतकी डीसीएचसी - २२
भिगवण डीसीएचसी - ५०
---------------------
आतापर्यंत इंदापूर आरोग्य विभागाच्या वतीने १ लाख १५ हजार २५६ आरटीपिसीआर चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आॅगस्ट महिन्यामध्ये इंदापूर शहर व तालुक्यातील एकूण २० रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर तालुक्याबाहेरील ३२ रुग्णांचा कोरोनामुळे इंदापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
------------------------------------
कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कोरोना परिस्थितीवर आरोग्य विभाग नियंत्रण ठेऊन आहे. संपर्कातील बाधितांचा शोध तत्परतेने घेतला जात आहे. परिणामी तपासण्या वाढवण्यात येत आहेत. नागरिकांनीदेखील गृह विलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणाचा पर्याय निवडावा. जेणेकरून कोरोना परिस्थितीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल.
- डॉ. जीवन सरतापे, तालुका आरोग्य अधिकारी, इंदापूर
---------------------------