पुणे :
* बांधकाम विभाग
महापालिका हद्दीत २३ गावांचा लवकरच समावेश होणार हे आता निश्चित झाले आहे़ त्यामुळे या गावांमध्ये पायाभुत सुविधा देतानाच, सुनियोजित विकास करणे हे आमचे प्राधान्य राहणार असल्याचे पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले़
पुणे महापालिकेची हद्द या गावांचा समावेशामुळे साधारणत: दीडशे चौरस किलो मिटरने वाढणार आहे़ त्यामुळे या भागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी मुलभूत सुविधा देतानाच विकास कामांसाठी जागा ताब्यात घेणे हेही महत्वाचे आहे़ आजमितीला या गावांमध्ये बहुतांशी ठिकाणी गुंठेवारीतील बांधकामे, दोन घरांचे कट टू कट बांधकाम, अरूंद रस्ते, अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आदी समस्याही आहेत़ याबाबतची माहिती महापालिकेला पीएमआरडीएकडून प्राप्त होईल त्यानुसार महापालिका कारवाईही करेल़ पण येथील नागरिकांना विश्वासात घेऊन आम्हाला या भागातील बकालपणा घालविण्यासाठी ‘टीपी’ (नगर नियोजन योजना) स्किम राबविणे आवश्यक आहे़
सन २०१७ मध्ये महापालिका हद्दीत ११ गावे समाविष्ट झाली़ या गावांमधील अनुभव पाहता काही ठिकाणी अनाधिकृत बांधकामे आहेत़ पण अनेक ठिकाणी चांगल्या विकासालाही वाव आहे़ त्यामुळे यापुढे प्लॅन डेव्हलपमेंटला आमचे प्राधान्य राहणार आहे़ सद्यस्थितीला जागा ताब्यात देताना जागामालक मोबदला म्हणून ‘टीडीआर’, ‘एफएसआय’ घेत नाही़ परिणामी टीपी स्किमच्या माध्यमातून जर आपण या भागात विकास केला तर, प्रभात रोड, बाणेर बालेवाडी सारखा विकास या ठिकाणी होऊ शकतो़ १९९७ साली महापालिकेत समाविष्ट झालेली गावे व त्यानंतर २०१७ मध्ये समाविष्ट गावे पाहता आपल्या पूर्वीचे धनकवडी करायचे की, सुनियोजित प्रभात रोड, बालेवाडी सारखे भाग करायचे हे नागरिकांच्या सहकार्याने शक्य असल्याचे वाघमारे यांनी सांगितले़
महापालिकेकडे गावे हस्तांतरित करताना पीएमआरडीएकडून महापालिकेला मोकळ्या जागा, अनाधिकृत बांधकामे, रस्त्यांची आरक्षणे आदी माहिती मिळेल़ यातून मोकळ्या जागांवर सुनियोजित विकास करून, पुढील पंचविस तीस वर्षांचा विचार करून रस्त्यांची आखणी आदी नियोजनातून या भागातील बकालपणा घालवून आपण विकासाच्या माध्यमातून या गावांना नवे रूप देऊ शकतो असा विश्वासही वाघमारे यांनी व्यक्त केला़
------------------