तानाजी करचे
पुणे: यूपीएससी आणि एमपीएससीची पूर्वपरीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यानिमित्त परीक्षा कोणतीही असो, ती जसजशी जवळ येते तसतसे परीक्षार्थींच्या मनावरचा ताण वाढत जाताे. त्यामुळे उडालेल्या गाेंधळातून वर्षभर केलेल्या तयारीला सुरुंग लागण्याची दाट शक्यता असते. असे विद्यार्थी अगदी परीक्षा केंद्राच्या आत जाईपर्यंत हातात पुस्तक घेऊन वाचन करताना दिसतात. विशेष म्हणजे पूर्वी परीक्षा देऊनही ते प्रचंड दडपणाखाली असल्याचे दिसतात. येत्या काही दिवसांतच केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयाेगाच्या पूर्वपरीक्षा होणार आहेत. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला हवी, परीक्षेची तयारी कशी करायला हवी, याबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी लोकमत प्रतिनिधी तानाजी करचे यांनी साधलेला संवाद.
प्रश्न - स्पर्धा परीक्षार्थींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुलनेत रिक्त हाेणाऱ्या जागांचा विचार करून त्यांना काय सांगाल?
उत्तर - प्रत्येक विद्यार्थ्यांची चॉइस असते, त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जरी वाढत असली तरी विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टिकोनातून बी-प्लॅन मात्र तयार करावा. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता ही एक टक्क्यापेक्षाही कमी असते. जरी स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आलं तरी खचून न जाता करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्या बी-प्लॅनकडे पाहायला हवं.
प्रश्न - पूर्वपरीक्षा जवळ आली आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला हवं?
उत्तर - परीक्षा जवळ आली तर विद्यार्थ्यांनी नवीन काही वाचू नये. वर्षभर जे तुम्ही वाचलं आहे त्याची उजळणी करावी. अभ्यासक्रम एवढा मोठा आहे की तुम्ही नवीन काही वाचायचं ठरवलं तर तो कधीच संपणार नाही. एकाच विषयाची पाच पुस्तक वाचण्यापेक्षा त्या विषयाचा एकच दर्जेदार संदर्भग्रंथ निवडा आणि तो पाच वेळा वाचा.
प्रश्न : दडपण येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी?
उत्तर : विद्यार्थ्यांमध्ये थोड्या प्रमाणात दडपण असायला हवं. जर दडपण नसेल तर विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत; परंतु जास्त दडपण असेल तर आपण जो अभ्यास केला आहे तो वाया जातो. सध्या तरी पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी रिलॅक्स राहायला हवं. जास्त ताणतणाव न घेता केलेल्या अभ्यासाची उजळणी करण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा.
प्रश्न : स्पर्धा परीक्षा तयारीत खासगी क्लासचे किती महत्त्व आहे? ताे लावायलाच हवा का?
उत्तर : हे विद्यार्थ्यावर अवलंबून असतं. असे कितीतरी विद्यार्थी आहेत, जे गावांमध्ये राहून अभ्यास करून अधिकारी झाले आहेत. क्लास लावूनही अधिकारी होता येतं आणि क्लास न लावताही अधिकारी होता येतं. फक्त विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची तयारी हवी.
प्रश्न : पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी एकत्रित कशी करावी?
उत्तर : काही विद्यार्थी मुख्य आणि पूर्वपरीक्षेचा अभ्यास सोबत करतात, तर काही पूर्वपरीक्षेचा अगोदर करतात. नंतर मुख्य परीक्षेचा करतात; परंतु साधारणत: जी परीक्षा आता सध्या विद्यार्थ्यांसमोर आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले पाहिजे.
प्रश्न : पूर्वपरीक्षेचा पेपर देताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
उत्तर :- पूर्व परीक्षेमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेचे नियोजन विद्यार्थ्यांना करता आलं पाहिजे. जो प्रश्न तुम्हाला येणार नाही, त्या प्रश्नांमध्ये अडकून पडू नये. सुरुवातीला जे प्रश्न सोपे वाटतात आणि ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येते, असे प्रश्न सोडवण्यावर जास्त भर द्यावा. वेळेचे नियोजन करण्यासाठी वर्षभर आपण पाठीमागील जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायला हव्यात.
प्रश्न : अभ्यासाचे नियोजन कसे?
उत्तर : अभ्यास करण्याची प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता वेगवेगळी असते; परंतु अभ्यासामध्ये सातत्य असायला हवं. आपण दिवसभर काय वाचन केलं, ते संध्याकाळी एकदा पाहायला हवं. मी स्वतः ८ ते ९ तास अभ्यास करत होतो.