राजेश टोपे : शीतसाखळी संसाधन केंद्राचे उद्घाटन
पुणे : लस घेताना नागरिकांनी मनात कोणतीही भिती बाळगू नये. कोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी लस हेच कवचकुंडल आहेत, त्यामुळे सर्वांनी लस घेतली पाहिजे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. लसीकरणाच्या प्रचार व प्रसिद्धीवर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे येथील राष्ट्रीय शीतसाखळी संसाधन केंद्राचे उद्घाटन तसेच शीतसाखळी उपकरणे चाचणी प्रयोगशाळाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ऑनलाईन उपस्थित होत्या आमदार दिलीप मोहिते, चेतन तुपे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, अभियान संचालक डॉ. रामास्वामी एन, संचालक डॉ. अर्चना पाटील होते.
टोपे म्हणाले, ''राष्ट्रीय शीतसाखळी संसाधन केंद्राने देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे. या ठिकाणी लसीची साठवणूक, व्यवस्थापन करण्यात येणार आहे. देशातही अनेक ठिकाणी अशी केंद्रे उभारली जातील. कोल्ड स्टोरेज करण्याचे प्रशिक्षणही या केंद्रात दिले जाणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात अशा राज्यांमधील नागरिक येथे शिकण्यासाठी येऊ शकतात. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत हे देशातील एकमेव केंद्र आहे. लसीचा साठा करणे, त्यासाठी सोलर रेफ्रिजरेटर आणि कुलरचा वापर याबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील शीतसाखळी साठवणूक येथे होणार आहे शीतसाखळी उपकरणांच्या शीतसाखळी उपकरणांचा मूल्यमापन आणि देखभालीसाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे.''
गोऱ्हे म्हणाल्या, ''राष्ट्रीय शीतसाखळी संसाधन केंद्र हे आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा आहे. लसीकरणा बाबतीत पुणे हे जागतिक पातळीवर मोठे केंद्र म्हणून ओळखले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मापदंड पाळून या केंद्राची उभारणी केली आहे.''
टोपे यांच्या हस्ते सार्वजनिक आरोग्य विभागास एनएबीएल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ऑक्सिजन व्यवस्थापन संबंधी तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. डॉ. रामास्वामी एन यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद मोरे यांनी आभार मानले.