बारामती : कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेक लोक यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरणावर भर दिला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा महिला आघाडी निरीक्षक डॉ. अर्चना पाटील व्यक्त केले आहे.
पत्रकारांशी बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या, वारंवार लॉकडाऊन होत असल्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे, शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे रोजगार यामधे गेलेले आहे, अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामधे अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. याचापण विचार सरकारने केला पाहिजे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी. तरच कोरोनावर आपण लवकर मात करू शकतो. अनेक देशांनी लसीकरण मोठ्या प्रमाणात केल्यामुळे कोरोनाला हद्दपार केले आहे, पण देशात लसीकरणावरून चालू असलेले राजकारण चुकीचे आहे. आज महाराष्ट्रामध्ये लसीकरणाची खूप विदारक परिस्थिती आहे. हजारो लोकांनी लसीकरणासाठी केंद्रावर रांगा लागलेल्या आहेत. अनेक ठिकाणी लस मिळत नाही, खूप मोठी गर्दी होत आहे. आपापल्या भागातील लोकप्रतिनिधींना येथील लोकांनी लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी आग्रह धरावा. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, हॉस्पिटल्स यांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात यावी, त्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी होईल. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असे डॉ. पाटील म्हणाल्या.