बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण? तालुका पोलिस ठाण्यात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 21:25 IST2024-12-12T21:25:29+5:302024-12-12T21:25:29+5:30
रुग्णांना जीवनदान देणारे डाॅक्टर घडविणाऱ्या या महाविद्यालयातच हा प्रकार घडल्याने येथील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण? तालुका पोलिस ठाण्यात तक्रार
बारामती :बारामती एमआयडीसीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषध निर्मात्याला सहायक प्राध्यापकाकडून मारहाण केल्याची तक्रार बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. रुग्णांना जीवनदान देणारे डाॅक्टर घडविणाऱ्या या महाविद्यालयातच हा प्रकार घडल्याने येथील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रुग्णालयातील औषध निर्माता किशोर पारधी यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सहायक प्राध्यापक डाॅ. राजेश मैलागिरे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि. ११) रोजी पारधी हे तात्पुरता पदभार असलेल्या डाॅ. राजेश मैलागिरे यांच्या दालनात चर्चेसाठी गेले.डाॅ. मैलागिरे यांनी सध्या मला वेळ नाही, बाहेर निघ असे सांगितले. मी परत केव्हा येऊ अशी विचारणा पारधी यांनी केली. त्यावर मैलागिरे यांनी त्यांना शिवी दिली. याबाबत पारधी यांच्या अंगावर धावून येत डाॅ. मैलागिरे यांनी त्यांना हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे यावेळी तेथे विभागप्रमुख डाॅ. राजेश हिरे, अमित पटवर्धन, राजेश दळे, सुधीर वनारसे हे उपस्थित असताना त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
वैद्यकीय महाविद्यालय ‘अजित पवार’ यांच्या रडारवर....
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेबाबत काही पदाधिकाऱ्यांनी देखील थेट तक्रारी केल्या आहेत. बारामतीत सप्टेंबरमध्ये झालेल्या जनसन्मान यात्रेत पवार यांनी या तक्रारीचा उल्लेख केला. याबाबत आपण लक्ष घालणार आहोत. माझ्या मायमाउलींना दिलेल्या सुविधा मिळत नसतील,तर माझ्या कानावर घाला,त्यात दुरुस्ती करु,असा इशारा त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला होता.त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार हे विधानसभा निवडणुकीत व्यस्त झाले. महाविद्यालयात झालेला प्रकार पवार यांच्यापर्यंत पोहचणार असल्याने पवार काय भूमिका घेतात,याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी देखील महाविद्यालयाबाबत आलेल्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी महाविद्यालयाच्या रुग्णालयाचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले होते.
रुग्णांना अरेरावीची भाषा
रात्री शासकीय रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्ण आल्यास डाॅक्टर उपलब्ध नसतात. त्यांना किरकोळ औषधे देऊन मार्गी लावले जाते. अशिक्षित रुग्णांना अरेरावीची भाषा वापरली जाते,असा अनुभव आल्याची माहिती बारामती येथील आण्णासाहेब शितोळे देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. रुग्णांना लिहून दिलेली औषधे, इंजेक्शन्स, गोळ्या बाहेरून आणायला सांगितले जाते, असे शितोळे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान,बाहेरुन औषध खरेदी करण्यास सुचविण्यामागे काही मंडळींचा असलेला ‘इंटरेस्ट’ यामुळे चर्चेत आहे. सर्वसामान्य रुग्णांना ती बाहेरून विकत घेण्याची वेळ का येते,याबाबत चाैकशी होणे गरजेचे आहे.