पुणे : पोस्टल मतदानासाठी अर्ज भरून दिला, पण २० तारीख उजाडली, तरी पोस्टल मतदान पत्रिका मिळाली नाही, ज्या कर्मचाऱ्यांना ही मतपत्रिका मिळाली त्यांच्या मतदान पत्रिकेवर सही करण्यासाठी अधिकारीच उपलब्ध नाही, मतदानाच्या दिवशी आपल्याच केंद्राध्यक्षाच्या सहीने मतदान करून मतपत्रिका पोस्टात टाकण्याच्या सूचना, या सर्व गोंधळामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदान करण्याचेच टाळले. यामुळे तब्बल ३० हजार पैकी ५० ते ६० टक्के कर्मचारी या पोस्टल मतदानापासून वंचित राहणार असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना मतदान करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, यासाठी सोशल मीडिया, पथनाट्य, प्रचंड फ्लेक्सबाजी करून नागरिकांना मतदान करण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे. परंतु नागरिकांना मतदान करण्याचा हा हक्क मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोस्टल मतदानाबाबतच प्रशासनाकडून उदासिनता दिसून आली. याबाबत लोकमतच्या वतीने पाहणी केली असता, यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना पोस्टल मतपत्रिकाच मिळालेली नाही. तर ज्या कर्मचाऱ्यांना ही मतपत्रिका मिळाली त्यांना तुमच्या मतदारसंघात जाऊन संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांच्या सहीने पोस्टल मतदान करा, अशा सूचना देण्यात आल्या. परंतु क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पोस्टल मतदानाशी आमचा कोणताही संबंध नाही, तुमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सही घ्या, असे सांगण्यात आले. यामुळे पोस्टल मतदानासाठी कर्मचाऱ्यांना आपले निवडणुकीचे काम संभाळून खराडी ते सिंहगड रोड, कर्वेनगर ते भवानी पेठ, कात्रज अशा विविध कार्यालयाच्या चकरा मारण्याच्या वेळ आली आहे. त्यामुळे इच्छा असून ही अनेक कर्मचा-यांनी पोस्टल मतदानाकडे पाठ फिरलवी असल्याचे चित्र आहे.
पोस्टल मतदानापासून कर्मचारीच वंचित
By admin | Published: February 21, 2017 3:19 AM