पुणे : बेकायदेशीरपणे चोरीचे घेतलेले वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या कर्मचार्यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार केसनंद मधील जोगेश्वरी सनसिटीमध्ये घडला. याप्रकरणी गणेश अप्पाराव श्रीखंडे (वय ३३, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पिंटु ऊर्फ जयंत सरडे (रा. कोरेगाव भिमा, ता़ शिरुर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गणेश श्रीखंडे आणि त्यांचे सहकारी अंजन शिंगणे हे केसनंदमधील मंगलमूर्ती वास्तू प्रा. लि. निर्मित जोगेश्वरी सनसिटीमध्ये शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता गेले होते. तेथे बेकायदेशीर चोरीने घेतलेले वीज कनेक्शनवर कारवाई करत होते. त्यावेळी सरडे हा त्यांच्या अंगावर धावून गेला. शिवीगाळ करुन दमदाटी व धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देऊन ते करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यांचे सहकारी अंजन शिंगणे याच्या हातातील १० हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.