दीपक जाधव , पुणेमहापालिकेच्या मुख्य इमारतीमधील आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या ४ अधिकाऱ्यांच्या केबिन दुसऱ्या विभागांना देऊन त्यांना पालिकेच्या बाहेर इतरत्र जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांच्या कर्मचारीवर्गाची व्यवस्था मात्र पालिकेच्या इमारतीमध्येच करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी पालिकेत आणि अधिकारी बाहेर अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.महापालिकेच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालये आहेत. अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून आरोग्य विभागाचा कारभार सुरू आहे. महापालिकेच्या कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे, त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना जागा कमी पडत आहे. त्यातून अनेकदा वादाचे प्रसंगही उभे राहात आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी १७ एप्रिल २०१५ रोजी जागा वाटपाबाबात खातेप्रमुखांची एक बैठक घेतली. त्यानुसार खातेप्रमुखांकडून आलेल्या सूचना- शिफारशी यावरून त्यांनी जागावाटपामध्ये बदल केले आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या या बदलांचा सर्वांत मोठा फटका आरोग्य विभागाला बसला आहे. सहायक आरोग्य प्रमुख (पीसीपीएनडीटी), सहायक आरोग्य प्रमुख (परवाना विभाग), सहायक आरोग्य प्रमुख (कीटक प्रतिबंधक व क्षयरोग), सहायक आरोग्य प्रमुख (मेडिकल युनिट आस्थापना) या ४ अधिकाऱ्यांचे केबिन काढून घेऊन ते दुसऱ्या विभागांना देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांच्या कर्मचारीवर्गाची व्यवस्था मात्र पालिकेच्या इमारतीमध्येच दाखविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या केबिनची पर्यायी व्यवस्था कमला नेहरू हॉस्पिटल, दळवी हॉस्पिटल येथे केली आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या केबिनची जागा सांख्यिकी संगणक विभाग, शिक्षण मंडळ, दक्षता या विभागासाठी देण्याचे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी सांख्यिकी विभागाने सहायक आरोग्य प्रमुख वैशाली जाधव यांच्याकडे केबिन तातडीने खाली करून देण्याची मागणी केली. जाधव यांच्या स्टाफसाठी मात्र पालिकेतील इमारतीमध्ये जागा दर्शविण्यात आली आहे. जाधव यांना मात्र कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये पर्यायी जागा दिली आहे. (प्रतिनिधी)
कर्मचारी पालिकेत; अधिकारी बाहेर
By admin | Published: September 30, 2015 1:40 AM