पुणे : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महापालिका भवनच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभाला तब्बल साडेचार हजार अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित होते. याची गंभीर दखल प्रशसनाने घेतली असून, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व अनुपस्थित अधिकारी, कर्मचा-यांना सक्त ताकीत देऊन अनुपस्थितीची नोंद सेवापुस्तकामध्ये करण्याचे आदेश मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांना दिले आहेत.
संपूर्ण राज्यात १ मे ला महाराष्ट्र राज्य स्थापन दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. शासनाच्या आदेशनुसार सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १ मे (महाराष्ट्र राज्य स्थापना दिन) आणि १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) या निमित्त होणा-या ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परंतु बुधवार (दि.१ मे) रोजी महापालिकेच्या वतीने महापालिका भवन प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सुमारे ५ हजार अधिकारी, कर्मचा-यांपैकी केवळ ४५० ते ५०० अधिकारी, कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. याबाबत रुबल अग्रवाल यांनी ही अत्यंत गंभीर बाब असून, शासनाच्या आदेशाबाबत कर्मचा-यांना गांभीर्य नसल्याचे आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे. याबाबत सर्व अनुपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांना सक्त ताकीत देऊन प्रत्येकाच्या सेवापुस्तकामध्ये याबाबत नोंद करण्याचे आदेश दिले, असल्याची माहिती दौंडकर यांनी दिली.