पुणे : महापालिका कर्मचारी वसाहतीमधील घरांमध्ये राहणारे कर्मचारी निवृत्त झाले तरी त्यांच्या वारसांना तिथे राहू द्यावे, ती घरे त्यांच्या नावावर करावीत, असा ठराव पालिकेच्या सभेत आज मंजूर करण्यात आला. वडारवाडी येथील पालिकेच्या वसाहतींमधील काही घरांचा विषय चर्चेला आला असताना त्याला उपसूचना मांडून असा विषय मंजूर करून घेण्यात आला. वडारवाडी येथे वडार समाजासाठी काही घरे केंद्र सरकारने दिलेल्या जागेत पालिकेने बांधून दिली आहेत. यातील काही घरे पालिकेने पालिका कर्मचाऱ्यांसाठी दिली. वडार समाजाकडून ही घरे आमची आहेत, आम्हाला द्यावीत अशी मागणी केली जात असून, बऱ्याच वर्षांपासून त्यासाठी आंदोलनही केले जात आहे. पालिकेने ज्यांना घरे दिली ते पालिका कर्मचारी आता निवृत्त झाले असून, त्यांच्या ताब्यातून घरे घ्यावीत व ती मूळ मालक असलेल्या वडार समाजाच्या कुटुंबाला द्यावीत असा विषय नगरसेवक मुकारी अलगुडे व अविनाश बागवे यांनी दिला होता. हा विषय चर्चेला आल्यानंतर नगरसेवक शारदा ओरसे यांनी त्याला विरोध केला. दत्ता बहिरट यांनीही पालिका कर्मचाऱ्यांना तिथेून हलवण्यास विरोध केला. मनपा कर्मचारी वसाहत ज्या प्रभागात आहे अशा धनंजय जाधव व मनीषा घाटे यांनीही या चर्चेत उडी घेतली. मूळ वडार समाजाचा विषय बाजूला पडला व मनपा कर्मचारी वसाहतींमधील घरे, निवृत्त झालेले कर्मचारी व त्यांचे नातेवाईक असे बरेच फाटे या विषयाला फुटले. मनपा कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची राहण्याची अडचण होते. त्यामुळे त्यांना तिथून काढू नये, घर त्याच्या कुटुंबीयांकडे राहू द्यावे अशी उपसूचना भाजपाचे गटनेते गणेश बीडकर, धनंजय जाधव यांनी मांडली. ही उपसूचना मंजूर करण्यात आली.(प्रतिनिधी)फेरविचाराची मागणी करणारसभेतील निर्णय वडार कुटुंबांवर अन्याय करणारा आहे. पालिकेचे कर्मचारीच नाहीत असेही अनेक जण वडारवाडी पालिका वसाहतीमध्ये राहात आहेत. त्यांचे पालिका काय करणार आहे. ज्यांच्या नावावर ही घरे आहेत ते मूळ मालक आज बेघर आहेत. त्यांना घरे नाहीत व त्यांच्या घरात पालिकेने दुसऱ्यांनाच घुसवले आहे, हे कसे योग्य समजले जाते ते कळत नाही. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी लवकरच करणार आहे.-मुकारी अलगुडे, नगरसेवक
निवृत्तीनंतरही घरे कर्मचाऱ्यांचीच
By admin | Published: February 19, 2016 1:50 AM