पुणे : कोरोना काळात ''फ्रंटलाईन वर्कर्स'' म्हणून काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लस घेणे आवश्यक आहे. लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर कोरोनाची लागण झाली तर पालिकेकडून दिले जाणारे कोणतेही लाभ आणि सुविधा दिल्या जाणार नाहीत, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिले आहेत.
शहरात राज्यातील पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ते आजवर पालिकेच्या सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी ही सर्व यंत्रणा अहोरात्र झटत होती. आतापर्यंत पालिकेचे ७०० पेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी बाधित झाले असून ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. १६ जानेवारीला देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना साथीत फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणार्या आरोग्य आणि सर्व शासकीय , निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले.
महापालिकेचे १८ हजार कर्मचारी असून कोरोना काळात फ्रँटलाईन वर्कर म्हणून ड्युटी बजावणार्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांना लस देण्यास सुरुवात केली. परंतु, अनेक अधिकारी व कर्मचार्यांनी लसीचा पहिला डोस देखील घेतलेला नाही. त्यामुळे लस न घेणाऱ्या अधिकारी व कर्मचार्यांना कोरोना झाल्यास त्यांना महापालिकेचे मिळणारे कुठलेही लाभ मिळणार नाहीत, असे आदेशच अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत.