---------------------------------
कॉमर्स हे आता बाजारपेठेपुरते मर्यादित राहिले नाही तर आपल्या मोबाईलवर आणि इंटरनेटच्या माध्यमातून जग एकत्र आले आहे. ई-कॉमर्स आणि एम-कॉमर्स अशा नवनवीन संकल्पना आणि त्यासाठी पूरक अशी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध झाली असून विपणन आणि वितरण अशा माध्यमातून आपल्या घरापर्यंत आवश्यक त्या सर्व वस्तू आणि सेवा तुलनात्मक दरामध्ये सहज आणि खात्रीशीर उपलब्ध होत आहेत. जगभरातून व्हर्चुअल बाजारपेठेत, प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी, हाताळणी, साठवणूक, पॅकेजिंग, हाताळणी, वितरण, घरपोच सुरक्षित वितरण अशा अनेकविध सेवांमध्ये खात्रीशीर, किफायतशीर आणि वेळेवर सेवा देण्यासाठी कॉमर्स आणि व्यवस्थापन ज्ञान असलेले मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. सद्य स्थितीत अगदी शेतमालसुद्धा अनेक कंपन्या अगदी घरपोच देत आहेत. त्यासाठी मोठी साखळी व्यवस्था निर्माण झाली आहे.
इंटरनेट व संगणकाचा उपयोग करून अनेक नवनवीन सेवा क्षेत्र निर्माण होत आहेत. डिजिटल क्रांतीमुळे वृत्तपत्रापासून, प्लम्बर आणि अगदी सौंदर्य सेवा आम्हाला घरपोच देण्याची एक मोठी व्यवस्था निर्माण होते आहे. अशा सर्व व्यवस्थेचे संचालन आणि समन्वय सांभाळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी संगणक आणि ग्राहक केंद्रीत सेवा देण्यासाठी अनेक कल्पक तरुणांची आवश्यकता आहे.
डिजिटल फायनान्स या क्षेत्रामध्ये, आर्थिक सेवा, वैयक्तिक, आरोग्य विमा क्षेत्र, बिहेविएरल फिनान्स, आर्थिक क्षेत्रामधील आॅनलाईन घोटाळे यांना नियंत्रित करणे, सायबर सिक्युरिटी, फिंटेक, इन्सोलवनसी, फॉरेन्सिक आॅडिट, आंतरराष्ट्रीय फिनान्स अशा अनेक नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. सर्व आर्थिक व्यवहार हे आॅनलाईन माध्यमातून होत असल्याने त्यांच्याशी निगडित अनेकविध सेवा आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तंत्रज्ञानाची आणि आर्थिक विषयाची पूर्ण माहिती असणारे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे.
सप्लाय चेन मॅनेजमेन्ट, सव्हिर्सेस मॅनेजमेन्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट (प्रकल्प व्यवस्थापन), अशी अनेक नवनवीन क्षेत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत. भाषा, संवादकला, तंत्रज्ञान, संगणकावर प्रभुत्व अशा अनेक कौशल्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ