भाषाशिक्षण, भाषांतर, भाषा आधारित संगणकीय प्रणालीची निर्मिती, अशा अनेक भाषाकेंद्रित अभ्यासासाठी भाषाशास्त्राची गरज असते. भाषाशास्त्राला भाषाविज्ञान व लिंग्विस्टिक्स असेही म्हटले जाते. भाषेचा उगम व विकास, भाषेचे सामाजिक व सांस्कृतिक बदल, माध्यमांची भाषा, लेखणाची भाषा, शैलीशास्त्र अशा अनेक बाबींचा अभ्यास भाषाशास्त्रात केला जातो. नोअम चॉम्स्की यांनी भाषेच्या अभ्यासात फार महत्त्वाचे कार्य केले आहे. तसेच भाषा ग्रहण कशी केली जाते, हे सुद्धा स्पष्ट करून सांगितले आहे.
भाषाशास्त्राचा अभ्यास कुठे करावा?
भाषाशास्त्राचा अभ्यास भारतात आणि जगाच्या अनेक कानाकोपऱ्यांत केला जातो. महाराष्ट्रात पुणे येथील डेक्कन कॉलेज डिस्क युनिव्हर्सिटी हे यातील अग्रगण्य आहे. प्रा. एस. एम. कत्रे यांनी १९३९ पासून या विषयाच्या अध्यापणाची सुरुवात येथे केली व १९५८ पासून येथे एम.ए. चा अभ्यासक्रम चालवला जातो. मुंबई विद्यापीठ, महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ वर्धा, नागपूर विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली, बनारस हिंदू विद्यापीठ हे काही अग्रगण्य विद्यापीठ आहेत. त्यात एम.ए. व काही ठिकाणी बी.ए. भाषाशास्त्र पदवी पाठ्यक्रम शिकविला जातो. याशिवाय आई.आई.टी. व सी.डॅकसारख्या ठिकाणी भाषा संशोधनाचे कार्य केले जाते.
रोजगाराच्या संधी
भाषाशास्त्रातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर यूजीसीची नेटची परीक्षा उत्तीर्ण करून भाषाशास्त्राचा प्राध्यापक होणे ही या विषयात अभ्यास करणाऱ्यांची प्रथम पसंती आहे. युनेस्को, यूजीसी, भाषा सर्वेक्षण संस्था उदा. डेक्कन कॉलेज मधील मराठी बोलीभाषा सर्वेक्षण प्रकल्प या ठिकाणी भाषा सर्वेक्षण करण्याकरिता संशोधकांची गरज असते. सी.डॅक, आई.आई.टी. या संस्थानांमध्ये संगणक आधारित यांत्रिक भाषांतर, कृत्रिम बृद्धिमत्ता विकास, यासारख्या कार्याकरिता भाषा वैज्ञानिक म्हणून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय उत्तम भाषांतरासाठी भाषाशास्त्राची मदत होते. त्यामुळे वैयक्तिक भाषांतर तज्ज्ञ तसेच बीट्स सारख्या भाषांतर करणाऱ्या कंपन्या यामध्ये सुद्धा भाषा वैज्ञानिकांची गरज असते. भारतातील बँक किंवा मंत्रालयामध्ये भाषा अधिकारी किंवा भाषांतर तज्ज्ञ पदांच्या जाहिराती येत असतात. तंत्रज्ञानातील पदवी व अन्य भाषिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा इंग्रजी किंवा अन्य भाषा शिकविण्याकरिता भाषज्ज्ञ निवडले जातात. माध्यम क्षेत्रात तसेच भाषा कन्टेन्ट डेव्हलपर, लीगल भाषा समजणारे तज्ज्ञ, लैंग्वेज थेरपिस्ट, असे अनेक कार्य करण्याकरिता भाषातज्ज्ञांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाषाशास्त्रात आपले करिअर करणे विद्यार्थ्यांना खूप लाभदायक होऊ शकते. वरील संधी व्यतिरिक्त वैयक्तिक व संस्थात्मक पातळीवर विविध क्षेत्रात कार्य करता येते.
-डॉ. राहुल म्हैसकर, प्राध्यापक, भाषाशास्त्र विभाग, डेक्कन कॉलेज