पिंपरी : महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. इच्छुकांनी प्रचार सुरू केला असून, या प्रचारयंत्रणेत विविध माध्यमांतून अनेकांना रोजगार उपलब्ध होत आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरू आहे. विरोधकांच्या तुलनेत मागे राहायला नको, याबाबत पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. यंदा चार सदस्यीय प्रभागपद्धती असल्याने प्रभागाचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारयंत्रणाही तितकीच सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी नियोजनबद्ध यंत्रणा राबविली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत कसे पोहोचता येईल, यानुसार नियोजन केले जात आहे. प्रभागात विविध कार्यक्रम राबविण्यासह मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे. प्रभागाचा विस्तार मोठा असल्याने इच्छुकांनी अगोदरपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. यंदा प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यासह ‘हायटेक’ प्रचारालाही प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. ‘गुड मॉर्निंग’पासून ते विविध सुविचार, संदेश या माध्यमातून प्रचार सुरू आहे. सोशल मीडियावर इच्छुकांचे टाकण्यात येणारे फोटो, त्याचे डिझाईन डिझायनरकडून करून घेतले जात आहे. ही यंत्रणा हाताळण्यासाठी स्वतंत्र माणसे नेमण्यात आली आहेत. त्यामुळे यातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यासह परिचयपत्रके छापण्यात आली असून, ही पत्रके घरोघरी पोहोचविली जात आहेत. काही ठिकाणी इच्छुक स्वत: घरोघरी जात आहेत, तर काही जणांनी या कामासाठी रोजंदारीवर माणसे नेमली आहेत. तीनशे ते चारशे रुपये देऊन त्यांच्याकडून हे काम करवून घेतले जात आहे. प्रचारासाठी चारचाकी वाहनांची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे इच्छुकांनी भाडेतत्त्वावर वाहने घेतली आहेत. महिनाभर प्रचारात मोठ्या प्रमाणात वाहनांचा उपयोग केला जात आहे. वाहनमालकाला रोजचे भाडे देण्यासह चालकालाही रोजगार मिळत आहे. (प्रतिनिधी)
प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून मिळतोय रोजगार
By admin | Published: January 06, 2017 6:33 AM