केडगाव:जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनीच तालुक्यात खासगीकरणाला प्रोत्साहन दिले आहे. तालुक्यातील खासगी कारखान्यांना ताकद देण्याचे काम त्यांनी केले आहे. संचालक मंडळाची निवडणूक न लढवता एकाही सभेला उपस्थित न राहता वेगवेगळ्या प्रकारे भीमा-पाटस कारखाना कसा अडचणीत येईल त्यादृष्टीने थोरात यांनी काम केले आहे. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन भीमा पाटस कारखान्यावरती केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे प्रतिपादन भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर यांनी केला आहे.
बारवकर पुढे म्हणाले की, कारखान्यात थोरात उपाध्यक्ष असताना त्यांच्या काळातील विनातारण ५१ कोटी रुपयांची ९० कोटी रुपये परतफेड कारखान्याने बँकेस केलेली आहे. तरीही आज अखेर वीस कोटी बाकी दिसत आहे. स्वतःची जिल्हा बँक अडचणीत जाऊ नये म्हणून त्यावेळेस कारखाने बँकेच्या हितासाठी हा निर्णय घेतला होता . यावरून त्यांचे कारखान्यापेक्षा जिल्हा बँकेवरती जास्त प्रेम दिसत आहे. पुणे जिल्हा बँकेचे भीमा पाटस वरती असणाऱ्या कर्जाची चुकीची आकडेवारी बँकेचे अध्यक्ष थोरात सांगत आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून आपण २०१७ - १८ व २०१८- २०१९ मध्ये कारखान्याला बँकेकडून कर्जाची उपलब्धता करून दिलेली नाही. तसेच २०२०- २१ साठी बँकेकडे कारखान्यांनी कर्ज मागणी प्रस्ताव दिल्यानंतर बँकेने त्यास नकार दिलेला आहे. त्यामुळेच कारखाना अडचणीत आला आहे.
कारखाना केंद्र व राज्य सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या मदतीने बँकांचे एकरकमी कर्ज परतफेड करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या कौशल्याने बँक ऑफ इंडियाचे ४२ कोटी ९३ लाख ७५ हजार ७७३ या रकमेचे ओटीस मार्फत ८ कोटी ६५ लाखामध्ये बँकेचे एकरकमी कर्ज परतफेड केलेली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारखान्याचा फायदा झाला आहे.
भविष्यात कारखाना निश्चितच अडचणीतून बाहेर पडणार आहे. बँकेचे अध्यक्ष थोरात यांनी कारखान्याच्या सन २०१९-२० मध्ये ऊस बिल ॲडव्हान्स दिसत असल्याचे सांगितले. सन २०१८- १९ या गळीत हंगामामध्ये सभासदांचे उर्वरित पेमेंट २ कोटी ७८ लाख रुपये सन २०१९ -२० मध्ये दिलेले आहे त्यामुळे ते सन २०१९ -२० च्या अहवालात बिल ॲडव्हान्स म्हणून दिसत आहे असेही बारवकर यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष हे कारखान्याची चौकशी करण्याबाबत वारंवार सांगत आहेत तर जेव्हापासून अध्यक्षांनी कारखान्याचे काम केले आहे तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या व आमच्या कालावधीतील व महाराष्ट्रातील त्यांच्या व आमच्या सर्वच पक्षांच्या कारखान्यांची चौकशी करण्यास त्यांनी सांगावे. त्याचे आम्ही स्वागत करू, असे उपाध्यक्ष बारवकर यांनी सांगितले.