सासवड : महाराष्ट्र शासन ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ सासवड येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयात जिल्हा परिषदेचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांनी रुग्णाच्या गरजेनुसार ग्रामीण रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातही मोफत उपचार देण्यात येणार असल्याचे सांगितले. शासनाचा हा पायलट प्रोजेक्ट पुरंदर व जुन्नर या तालुक्यांत होत आहे.या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, सासवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामदेव शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. ऊर्मिला शिंदे, डॉ. प्राची उत्तरवार, सासवड येथील प्रसिद्ध श्री चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. भास्कर आत्राम तसेच डॉ. चंद्रकला पवार, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक व महिला उपस्थित होत्या.खासगी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत दररोज सेवा पुरविण्यासाठी त्यांना मासिक ५० हजार रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. हे सर्व तज्ज्ञ २४ तास ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असतील. त्यांना त्यांचे रुग्णालय ते ग्रामीण रुग्णालयात प्रवासासाठीसुद्धा शासन गाडी देणार आहे. यासाठी खासगी डॉक्टरांचे एक पॅनेल तयार करण्यात आले असून, एखादा तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित न राहिल्यास लगेच दुसरा उपलब्ध करून दिला जाईल. पुरंदर तालुक्यातील महिलांना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. तसेच, सासवड येथील चिंतामणी हॉस्पिटल आणि धन्वंतरी हॉस्पिटल येथील स्त्रीरोगतज्ज्ञ वेळोवेळी औषधोपचार करतील. रुग्णांना या ठिकाणी येण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामार्गात मोफत वाहनाची सुविधा देण्यात येणार आहे.महिलांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा पुरविणे, गरोदर काळात प्रत्येक तीन महिन्यांनी मोफत सोनोग्राफी केली जाणार आहे. तसेच, सरकारी रुग्णालयांत प्रसूती संख्या वाढविणे, तसेच गरजेनुसार सिझेरियन शस्त्रक्रिया केली जाणार आहे.ज्या सुविधा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहेत त्या तेथेच दिल्या जाणार आहेत, तर ज्या उपलब्ध नाहीत त्या सुविधा खासगी रुग्णालायत दिल्या जाणार आहेत व त्यांचे सर्व पैसे स्वत: शासन देईल. याचबरोबर महिलांच्या गरोदरपणातील नियमित तपासणी, आहार तसेच प्रसूतीनंतर सर्व औषधोपचार केले जाणार आहेत.
ग्रामीण रुग्णालय सक्षमीकरण, गरोदर महिलांना मोफत औषधोपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:14 AM