पुणे : बीआरटीमुळे वाहतूककोंडी सुटली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचा फेरविचार करण्याच्या महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या भूमिकेवर वाहतूक तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी बीआरटी बंद करण्याऐवजी ती अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बीआरटी सुरू करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांशीच चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा चर्चा कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना गायकवाड यांनी बीआरटीबाबत आपली भुमिका स्पष्ट केली. ‘बीआरटी मार्गातून सलग बस जात नाही. या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी झाली नाही. त्यामुळे याचा फेरविचार करावा लागेल. शहरात ८० टक्के दुचाकी वाहने आहेत. या वाहनांना बीआरटी मार्गातून प्रवेश देता येईल का?, यावर तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल. चर्चा करूनच बीआरटी बाबत निर्णय घेऊ, अशा स्पष्ट शब्दांत गायकवाड यांनी बीआरटीला रेड सिग्नल दिला आहे. यावर वाहतूक तज्ज्ञांसह पीएमपी प्रवासी संघटनांनीही टीका केली आहे. बीआरटी बंद करून वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. उलट बीआरटी अधिक सक्षम करण्याची गरज आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बीआरटी हा उत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.मुळात सर्व अभ्यासाअंतीच शहरात बीआरटीला सुरूवात करण्यात आली. आता पुन्हा तज्ज्ञांशी चर्चा करून काहीच साध्य होणार नाही. खासगी वाहनांना प्रोत्साहन दिल्यास कोंडीत अधिकच भर पडेल. आतापर्यंत बीआरटीवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यादृष्टीने बस खरेदी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत बीआरटी बंद करणे चुकीचे ठरेल, असे तज्ज्ञांनी नमुद केले.-------------सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी बीआरटी चांगली आहे. ती अधिक सक्षम करण्यासाठी अट्टाहास हवा. योग्यप्रकारे अंमलबजावणी न झाल्याने शहरात बीआरटी अयशस्वी ठरली, हे अधिकाºयांनी मान्य करायला हवे. पुणेकरांचे कोट्यांवधी रुपये खर्च होत असताना प्रशासकीय व्यवस्था डोळे व तोंड बंद करून बसली होती का? बीआरटी बंद केली तर ही सर्व पुणेकरांची केलेली घोर फसवणूकच होईल. करदात्यांच्या पैशावर टाकलेला मोठा दरोडा असेल. आयुक्तांनी तात्पुरता पर्याय शोधण्यापेक्षा बीआरटीच्या माध्यमातून दीर्घकालीन विचार करायला हवा.- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच...........सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून शहरातील ८० टक्के प्रवासी वाहतूक व्हायला हवी, असे ध्येय निश्चित केले आहे. त्यासाठी बीआरटीला प्राधान्य द्यायलाच हवे. त्याशिवाय ही व्यवस्था सक्षम होणार नाही. बीआरटी सुरू झाली तेव्हा १२ टक्के प्रवासी हे दुचाकी सोडून बसकडे वळले होते. एका बसमधून जवळपास ८० प्रवासी ये-जा करू शकतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी इतर खासगी वाहनांच्या तुलनेतच बसचे महत्व खूप आहे. एकुण १०० किलोमीटर बीआरटी मार्ग प्रस्तावित आहे. सातारा रस्ता बीआरटीचे कोट्यावधी रुपये खर्चुन पुर्नविकासाचे काम सुरू आहे. गणेशखिंड रस्त्यावर बीआरटी प्रस्तावित आहे. ही कामे अधिक वेगाने पुर्ण करण्याऐवजी बीआरटीच बंद करणे योग्य नाही. खासगी वाहनांचे कितीही लाड केले तरी वाहतूक कोंडी सुटणार नाही. २०१५ मध्ये सर्व अभ्यास करूनच बीआरटी सुरू करण्यात आली. विकास आरखड्यासह इतर अहवालांमध्ये बीआरटीला प्राधान्य देण्यात आले. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. त्यामुळे बीआरटी बंद करणे चुकीचे ठरेल.- प्रांजली देशपांडे, वास्तुविशारद व वाहतूक नियोजनकार-----------
बीआरटीमुळे वाहतूक कोंडी सुटलेली नाही, असे आयुक्तांचे मत आहे. मुळात आपण बीआरटी व्यवस्थित केलीच नसताना असा निष्कर्ष कसा काढता येईल? वाहतूक कोंडी ही खासगी वाहनांच्या भरमसाठ वाढीमुळे झाली आहे. तिच्यावर नियंत्रण आणायला आपण काय केले? उदा. पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी केली का? दुचाकींसाठी फ्री वे केल्यास त्यांचा वापर अजून वाढेल. मग कोंडी कमी होईल का? बीआरटी सारखे प्रकल्प सर्वसाधारण सभेने मंजूर केले आहेत, ते काही विचार करूनच. केवळ एका अधिकाºयाच्या मतानुसार त्यांचा फेरविचार करता येणार नाही.- हर्षद अभ्यंकर,सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट