- विवेक भुसे पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस दलाकडून वेगवेगळे उपाय राबविले जातात. परंतु प्रत्यक्ष स्थानिक पातळीवर काम करणाऱ्यांना त्याबाबत अधिक जागरूक आणि तांत्रिक सहकार्य पुरविले तर ते अधिक चांगल्या प्रकारे या गुन्हेगारीवर नियंत्रण आणू शकतील, या विचाराने पुणे शहर पोलीस दलाने शहरातील १२८ पोलीस चौक्या अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे़पुणे शहरात पोलीस चौकीसारखी पद्धत इतरत्र नाही़ काहीही कारण घडले तर पुण्यातील नागरिक हे आपल्या जवळच्या पोलीस चौकीमध्ये सर्वप्रथम धाव घेतात़ मात्र, आजवर या पोलीस चौक्यांकडे दुर्लक्ष झाले आहे़ अनेक जुन्या पोलीस चौक्या मोडकळीला आल्या आहेत़ त्या ठिकाणी साधनसुविधा उपलब्ध नाही़ अनेक पोलीस चौक्यांमध्ये साध्या स्वच्छतागृहचीही काही वर्षांपर्यंत सुविधा नव्हती़ ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़आपल्या भागातील पोलीस ठाण्याचा निरीक्षक कोण आहेत, हे अनेकांना माहिती नसते़ मात्र, पोलीस चौकीमध्ये कोण उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आहेत, याची त्यांना माहिती असते़ या पोलीस चौकीमध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी हे परिसरात परिचित असतात़ अन्य वरिष्ठांपेक्षा त्यांनी सांगितले तर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो, हे लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर काम करणाऱ्यास बळ देण्यात येणार आहे़पोलीस चौकी सबलीकरणामध्ये जनतेमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत नकारात्मक समज कमी करणे़ पोलिसांप्रती विश्वास वाढविणे, पोलीस दलाची निष्पक्षपातीपणा, त्वरित आणि कायदेशीर कर्तव्यपालनबाबतची वैधता वाढविणे़ त्यासाठी स्थानिक पातळीवर पोलिसांची दृश्यमानता वाढविणे़ कम्युनिटी पोलिसिंगचा वापर करणे, समस्यांपेक्षा त्यांची उत्तरे शोधण्यावर भर देणे यावर भर असणार आहे़सध्यस्थितील समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यावर भर दिला जाणार आहे़ त्यात उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य वापर करणे, गुन्हे प्रतिबंधावर विशेष भर देणे, स्थानिक पातळीवर उच्च प्रतिची पोलीस सेवा देणे, संवेदनशील व महत्त्वाच्या गुन्ह्यांबाबत जनतेला आश्वस्त करणे़पोलीस चौकीच्या हद्दीत यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण किती आहे़ कोणत्या वेळी, कोणत्या काळात आणि कोणत्या पद्धतीचे अधिक गुन्हे त्या परिसरात घडतात़ या माहितीचा डाटा संकलित केला आहे़ त्यात प्रत्येक पोलीस चौकीच्या अंतर्गतची सर्व माहिती तसेच प्रत्येक दिवस व सणानुसार व महिन्यांनुसार पृथ्थकरण करण्यात आले आहे़ पोलीस चौकी व तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याबाबत नेमकी अचूक माहिती पुरविण्यात येत आहे़ त्यातून अशा घटना व त्या परिसरावर त्या काळात ते अधिक लक्ष ठेवतील़ त्यांना आपले नेमके काय काम आहे, हे लक्षात येईल़ यापूर्वी कोणताही सण आला की बंदोबस्त लावला जातो़ तो सरसकट असतो़ मात्र, यापूर्वी या काळात कोणत्या ठिकाणी काय प्रकार घडला होता़ याची माहिती आता पोलीस चौकीला उपलब्ध असणार आहे.>नियंत्रण कक्षाला मदतीचे कॉलपुणे शहरातील परिमंडळ एक यामधून गेल्या वर्षभरात पोलीस नियंत्रण कक्षाला तब्बल ९ हजार ९७२ कॉल करण्यात आले होते़ जवळपास निम्म्याहून अधिक कॉल हे मदतीसाठी होते़ त्याखालोखाल २ हजार ३३० कॉल हे भांडणाबाबतचे होते़ त्यानंतर ध्वनीप्रदूषणाचे १ हजार २०५ कॉल होते़अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात आणि महिन्याच्या प्रत्येक दिवशी कोणत्या प्रकारचे कॉल कोणत्या भागातून आले याची नोंद ठेवण्यात आली आहे़ त्याचे पृथ्थकरण करुन ती माहिती पोलीस चौकीला देण्यात आली आहे़>नागरिकांचा पोलीस चौकीशी थेट संपर्क असतो़ त्यांना त्याच पातळीवर योग्य ते मार्गदर्शन मिळण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे व्यावसायिक कौशल्य वाढविण्याचा यात प्रयत्न करण्यात येत आहे़ त्यासाठी त्यांना अन्य मदतीबरोबर त्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून माहिती दिली जाईल़ त्यांचे सबलीकरण झाले तर ते अधिक चांगली सेवा नागरिकांना देऊ शकतील़- सुहास बावचे,पोलीस उपायुक्त
गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी चौकी करणार सक्षम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 1:08 AM