पुणे : शहरातील रस्त्यांवर, फुटपाथवर तथा बेकायदेशीर बांधकाम असलेल्या भागात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तत्काळ कारवाई केली जाते. हातावर पोट असलेल्या टपरीचालक, हातगाड्या, भाजीविक्रेते यांच्यावर अतिक्रमणाचा ठपका ठेवून लागलीच कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासन तत्पर असते. परंतु, नागरी सुविधांसाठी महापालिकेच्या ताब्यात असलेल्या आपल्या ॲमेनिटी स्पेसवरील अतिक्रमणे महापालिकेला का दिसत नाहीत? सोयीस्कररीत्या याकडे काणाडोळा करून केवळ अतिक्रमणांचा कांगावा करीत, त्याच्या व्रिकीचा प्रस्ताव मांडणे ही दुटप्पी भूमिका प्रशासन का घेते, याचे कोडे सर्वसामान्यांना आहे.
चौकट
महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन ॲमेनिटी स्पेस सांभाळण्यात अपयशी ठरत आहे. उत्पन्नाच्या नावाखाली मूठभर धनदांडग्यांच्या हितासाठी नागरिकांना सुविधा देण्यासाठी असणाऱ्या ॲमेनिटी स्पेसच्या विक्रीचा घाट घातला जात असल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. या ॲमेनिटी स्पेसच्या विक्रीऐवजी त्यांना संरक्षण द्यावे, या जागा अतिक्रमणमुक्त कराव्यात अशी मागणी कॉंग्रेसने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.