राजगुरुनगर: खेड-कनेरसर रस्त्यावर पाबळ रोड येथे फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या अतिक्रमणांकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत असून यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे.
खेड ते कनेरसर हा रस्ता काही वर्षांपूर्वी प्रशस्त करण्यात आला. खेडच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प आल्याने काही दिवसांतच पुणे-नाशिक महामार्गालगतचा पाबळ रोड हा मुख्य चौक बनला आहे. मुख्य चौकात रस्ता प्रशस्त करताना पादचारी यांना जाण्यासाठी फुटपाथ तयार करण्यात आला. मात्र, या फुटपाथ फळविक्रेते दुकानदारांनी व्यापून टाकला आहे. मोबाईल शॉपी, पानटपरी, चिकन दुकानदारांनी फुटपाथवर दुकाने थाटली आहेत. तसेच काही फळविक्रेत्यांनी फुटपाथ सोडून थेट रस्त्यावर हातगाडी उभ्या केल्या आहेत. त्यामुळे अर्धा रस्ता व्यापून गेला आहे. त्यातच काही खासगी वाहनचालक या रस्त्यावर बिनधास्तपणे चारचाकी वाहने या ठिकाणी वाहने लावतात. त्यामुळे रहदारीस प्रंचड अडथळा निर्माण होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हॉटेल, किराणा दुकान व इतर दुकाने असल्यामुळे नागरिक रस्त्यावरच दुचाकी उभ्या करून हॉटेल व किराणा दुकानांत खरेदी करण्यासाठी जात असतात.
खेडच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प आल्याने त्या दृष्टीने हा रस्ता बनविण्यात आला होता. दिवसेंदिवस या रस्त्यावर पाबळ चौक ते चव्हाणमळा या १ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सर्रास दिवसरात्र वाहने उभी असतात. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांना मोठी कसरत करून वाट काढावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा प्रांत आयुष प्रसाद व राजगुरुनगर नगर परिषेदेने या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकली होती. दरम्यान, रस्त्याने काही दिवस मोकळा श्वास घेतला होता. नंतर हळूहळू या पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. नगरपरिषद व पोलिसांनी लक्ष रस्त्यावर उभ्या केलेल्या हातगाड्या व स्टॉल हटवावे व रस्ता वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहेे.
दुकानदारांनी रस्त्यावर हातगाडी व इतर स्टॉल लावल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही पोलीस या फळविक्रेते, पानटपरीधारक, वडापाव हातगाडीवाले यांच्याकडून दर महिन्याला चिरीमिरी घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच हे विक्रेते रस्त्यावर हातगाड़ी स्टॉल उभे करण्याचे धाडस करत आहे.
०८ राजगुरुनगर