देऊळगावराजे : शिरापूर (ता. दौंड) येथे झालेल्या ग्रामसभेत गाव पुढाऱ्याने स्मशानभूमीवर केलेल्या अतिक्रमामुळे ग्रामसभा वादळी ठरली. १ मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ‘जगणं सोपं पण... मरणं अवघड’ अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जगताप यांनी उपस्थित केली.शिरापूर येथील स्मशानभूमीचा गट नंबर १२/२ मध्ये २० गुंठे जागा आहे. परंतु स्मशानभूमीची जागा एका गाव पुढाऱ्यानेच बळकावल्यामुळे येथील ग्रामस्थ त्या जागेसाठी मेटाकुटीला आले आहेत. परंतु पुढारी जागा सोडण्यास तयारच नाही आणि त्याच्याविरोधात तक्रार करण्यास कोणीही तयार होत नाही. गेली कित्येक वर्षे फक्त ग्रामसेभेतच हा विषय चर्चत येतो, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नाही.यापूर्वी त्या जागेत स्मशानभूमी बांधण्यात आली. परंतु स्मशानभूमी बांधल्यानंतर काही दिवसच त्यामध्ये अंत्यविधी होत होते. परंतु त्यानंतर सदर जागा एका पुढाऱ्याते ताब्यात घेऊन सर्व रस्ते बंद केले. त्या २० गुंठे जागेत ऊस पीक लावल्याने स्मशानभूमीमधील शोकाकुलांना अंत्यविधीसाठी अडचणी निर्माण झाल्या. पर्यायाने शोकाकुलांना भीमानदी पात्रातच अंत्यविधी करावे लागत आहेत. परिणामी शोकाकुलांची कुचंबणा होत आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या शोकाकुल नातेवाईकांना या ठिकाणी बसायला जागा नाही. त्यामुळे काही ग्रामस्थ आपल्या सोयीनुसार सिद्धटेक (ता. कर्जत) येथे दहावा करतात. या २० गुंठे जागेबाबत दर ग्रामसभेत ठराव तयार होतो. मात्र ग्रामसभा संपल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होत असते. त्यामुळे गावात त्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य ग्रामस्थ बोलत नाहीत. मात्र ती जागा मिळावी यासाठी सर्वच ग्रामस्थ आपआपसात कुजबुज करत असतात. परंतु गाव पुढाऱ्याच्या या अतिदहशतीमुळे ग्रामस्थ त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे धजावत नाहीत व याचाच फायदा हा गावपुढारी घेत आहे. प्रत्येक ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जगताप यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करूनही स्मशानभूमीचा प्रश्न का सुटत नाही, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडत आहे. जर हा प्रश्न सुटला नाही तर पुढील काळात ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे.यावेळी सरपंच सुलोचना बर्ड, ग्रामसेवक शीतल कापरे, तलाठी फरांदे, मारुती होलम, गोकर्ण खेडकर, अरुण सातव, अशोक जगताप, प्रशांत सांळुखे, मधुकर गोडसे, भरत घोलप ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)स्मशानभूमीची जागा मोकळी केली जाईलग्रामपंचायतीला दोन दिवसांत नोटीस काढून त्या जागेबाबात संबंधिताने केलेले अतिक्रमण काढण्यासाठी सांगण्यात येईल व स्मशानभूमीची जागा मोकळी केली जाईल. - संतोष हराळे, गटविकास अधिकारी
स्मशानभूमीवरच अतिक्रमण
By admin | Published: May 04, 2017 1:45 AM