यवतमध्ये सेवा रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे पीएमपीएल, एसटी बस उभी करताना अडथळा निर्माण होतो. ठिकठिकाणी झालेली अतिक्रमणे व नंतर केली जाणारी पार्किंग यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते.
मागील काही वर्षांपूर्वी महामार्गाचे रुंदीकरण केले. त्यावेळी सर्व अतिक्रमणे काढण्यात आली होती. मात्र, आता हळूहळू परत अर्धा सेवा रस्ता अतिक्रमणांमुळे व्यापला गेला आहे.
हडपसर ते पुणे पीएमपीएल बस सुरू झाल्यानंतर या सेवेला प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. बस सेवा सुरू झाल्याने अनेक कामांसाठी पुण्याला जाणाऱ्या नागरिकांची कमी दरात सोय झाली. मात्र, बस थांबाच नसल्याने तर जेथे थांबा आहे. तेथे अतिक्रमणे झाल्याने प्रवाशांना सेवा रस्त्यावर बसची वाट पाहावी लागते. यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
अनेक लहानमोठे विक्रेते, दुकानदार, हॉटेलचालक यांनी सेवा रस्त्यावर मिळेल तिथे अतिक्रमण करत सुटली आहेत. मुख्य महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती बरोबरच सेवा रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम टोल वसुली करणाऱ्या कंपनीने करणे आवश्यक आहे. मात्र, टोल वसुली कंपनी याकडे कसलेही लक्ष देत नाही तर, महामार्ग प्राधिकरणदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यवत येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, महामार्गाच्या सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. अशाच वाहतूक कोंडीचा अनुभव परिसरातील नागरिकांना कायम घ्यावा लागतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
महामार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर महामार्गाची हद्द निश्चित करण्यात आली होती. आता काही ठिकाणी महामार्गाच्या हद्दीत पक्के बांधकाम करून गाळे बांधले आहेत. तर अनेक ठिकाणी तात्पुरती अतिक्रमणे करून हळूहळू पक्की करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. परत एकदा महामार्गाच्या सेवा रस्त्याचे बकालीकरण आताच रोखणे गरजेचे आहे.
पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर असलेल्या बस थांब्यासमोर व इतर ठिकाणी वाढती अतिक्रमणे.