कोथरूड : मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्तावर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी वॉलेट पार्किंगच्या नावाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्यानेच कर्वे रस्तावर वाहतूककोंडी होत असून, महापालिकेचे अतिक्रमण अधिकारी आणि वाहतूक पोलिसांचे मोठ्या व्यावसायिकांना अभय असल्यानेच कर्वे रस्तावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.कोथरूड भागाला पुण्यातील सर्वाधिक हॉटेल्स असल्याचा भाग म्हणून संबोधले जात असून, या भागातील एकाही हॉटेल व्यावसायिकाला स्वत:च्या मालकीची पार्किंगची सोय नाही. असे असतानाही या भागातील व्यावसायिकांनी रस्त्यावरच खासगी पार्किंगचे (वॉलेट पार्किंगचे) फलक लावले आहेत. महापालिकेच्या वतीनेही या हॉटेल्स व्यावसायिकांनी मंजूर केलेल्या पार्किंगच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यानेच रस्त्यावरील वाहतुकीला या पार्किंगचा त्रास सहन करावा लागत आहे.कोथरूड भागातील मुख्य रस्त्यावर तासन्तास वाहनांच्या रांगा लागत असतानाही वाहतूक पोलिसांच्या वतीने मात्र याकडे हेतूत: दुर्लक्ष करण्याचे काम केले जात आहे. कोथरूड वाहतूक पोलीस निरीक्षक संदीपान सावंत कोथरूडच्या मुख्य रस्त्यावर ध्वनिक्षेपकातून वाहने काढण्यासाठी मोठ्या आवाजात प्रबोधन करत फिरत असतात. परंतु त्यांच्याकडूनही मुख्य रस्त्यावरील खासगी पार्किंगच्या नावाने केलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्याचेच काम केले जात आहे.या भागातील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. (वार्ताहर)
हॉटेल चालकांचे अतिक्रमण
By admin | Published: May 30, 2015 1:06 AM