पुणे : राज्य शासनाने मागील वर्षी सप्टेंबर २०१४ मध्ये महापालिकेसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी महापालिकेस मान्यता दिली असताना दहा महिने कागदावरच असलेले पोलीस ठाणे येत्या १५ दिवसांत कोणत्याही स्थितीत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरूवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राज्य शासनाने मागील आठवड्यात या पोलीस ठाण्यातील पदांना मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्याची दखल घेत अतिक्रमण विभागाकडून पोलीस आयुक्त कार्यालयास तातडीने पत्र पाठवून कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी पत्र पाठविण्याच्या सूचना कुमार यांनी अतिक्रमण विभागास दिल्या आहेत. गेल्या दशकभरात शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे, तसेच अतिक्रमणांची संख्या वाढली आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नाही. त्यामुळे ही कारवाई अधिक सक्षमपणे करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याची मागणी केली होती. त्यास शासनाने मागील वर्षी मान्यता देऊन १५ पदांची निर्मिती केली होती. त्यानंतर सहा ते सात महिन्यांपूर्वी हे पोलीस ठाणे सुरू करण्याचे आदेशही राज्य शासनाने पालिकेस दिले होते. त्यानुसार, या वर्षीच्या अंदाजपत्रकात प्रशासनाने तीन कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. याबाबत शहर पोलिसांशी चर्चा झाल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, पुढील १५ दिवसांत हे पोलीस ठाणे सुरू केले जाईल, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.महापालिकेस शहरात अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, शहर विद्रुपीकरण, तसेच अनेक कारवाया कराव्या लागतात. त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने या कारवाईत सातत्य राहत नाही. त्यामुळे स्वतंत्र पोलीस ठाणे उपलब्ध झाल्यास या कारवाईस आणखी वेग येणार आहे. तसेच महापालिकेस खटले दाखल करणेही सहज शक्य होणार आहे. सध्या खटले दाखल करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून ठाण्यांमध्ये ताटकळत ठेवले जात असल्याने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. मात्र, या ठाण्यामुळे गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईलाही वेग येणार आहे.
अतिक्रमण पोलीस ठाणे १५ दिवसांत सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2015 3:58 AM