पुणे : महापालिकेच्या १५ पैकी १३ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग समित्यांवर ३९ स्वीकृत सदस्यांची निवड आज झाली. त्यामध्ये सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांऐवजी राजकीय पक्षपुरस्कृत कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केल्याचे चित्र आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे पुरस्कृत सर्वाधिक २३, काँग्रेसचे ९, भाजप ६ आणि मनसेसंलग्न एका कार्यकर्त्यांला संधी मिळाली. महापालिकेच्या प्रभाग समितीतील कामकाजामध्ये बिनसरकारी व सामाजिक कार्यकर्त्यांना सहभाग मिळावा म्हणून स्वीकृत सदस्यांची निवड केली जाते. त्यामध्ये राजकीय पक्षाचा पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेतील कोणालाही निवड प्रक्रियेत भाग घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी स्वीकृत सदस्य निवडीअगोदर पदाचे राजीनामे देऊन सामाजिक संस्था व प्रतिष्ठानकडून शिफारसपत्रे मिळाली. स्वीकृत सदस्याच्या पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे असल्याने बहुतेक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लागल्याचे चित्र आहे. प्रभागस्तरीय नगरसेवकाला कमाल तीन मते देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नगरसेवकांनी अशा उमेदवारांना पुरस्कृत केले, की जे त्यांचे विश्वासू व निकटवर्तीय आहेत. नगरसेवकपदाच्या निवडीत ते अडचणीचे ठरणार नाहीत. अशा स्वीकृत सदस्यांची निवड करताना येरवडा व वडगावशेरी भागात पक्षश्रेष्ठींचे आदेशही डावलण्यात आल्याचे प्रकार दिसून आले. कसबा-विश्रामबाग आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत संख्याबळानुसार भाजप पुरस्कृत सदस्यांची निवड झाली. तर, नगर रस्ता, येरवडा, हडपसर, कोंढवा व धनकवडी येथे राष्ट्रवादी पुरस्कृत सदस्यांना संधी मिळाली. भवानी पेठ व ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत काँग्रेस पुरस्कृत सदस्यांना संधी मिळाली. मात्र, टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मनसेशी संलग्न सदस्याला संधी मिळाली. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांवर राजकारण्यांचे अतिक्रमण
By admin | Published: May 14, 2015 4:16 AM