सासवड : पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गट नंबर ७९९ मधील जागेवर सुपे गावातील काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे, हे अतिक्रमण काढण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने पुरंदर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे अतिक्रमण काढण्याची मागणी केलेली आहे. संबंधित जागा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,पुणे यांच्या नावाने राघवेंद्र पुरंदरे यांनी बक्षीस पत्राद्वारे शाळेला दिलेली आहे. सदरील जागेवर काही नागरिकांनी राजकीय वजन वापरून अतिक्रमण केल्याने पुढील काळात शाळेमध्ये भौतिक सुविधा व विविध उपाययोजना करण्यासाठी अडचणी येणार आहेत.
सदरील जागा शाळेच्या ताब्यात असेल तर नियोजनाप्रमाणे येथे सुविधा करता येतील. या अगोदर जागेची सरकारी मोजणीदेखील झालेली आहे. तरी देखील काही नागरिक राजकीय दबावाने या जागेवर अतिक्रमण करीत आहेत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ‘समग्र शिक्षा’अंतर्गत भौतिक सुविधा उपलब्ध करून, दुरूस्ती करण्यात येणार आहेत. त्यामुळे शाळेच्या जागेतील अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे, असे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप व मुख्याध्यापिका मंगल कामथे यांनी सांगितले.
—————————————————————————————
ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांनी सदरची अतिक्रमण काढणे गरजेची असल्याचे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, मुख्याध्यापिका मंगल कामथे, शाळा व्यवस्थापन समितीचे तुकाराम जगताप व ग्रामसेवक रोहित अभंग यांनी पाहणी करून सांगितले आहे.
——————————————————————————————————
शाळेच्या जागेत अतिक्रमणासंदर्भात शाळेकडून पत्र प्राप्त झालेले आहे. त्यावर पोलीस बंदोबस्तात सदरची अतिक्रमणे काढावीत, असे ग्रामपंचायतीला कळविले आहे.
— मोहन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, पुरंदर पंचायत समिती