भिगवण : तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण करू नका, असे सांगण्यासाठी गेलेल्या सरपंच महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्याबाबतची फिर्याद भिगवण पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे.
याबाबत तक्रारवाडी गावाच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी माहिती दिली. बुधवारी (दि. ८) गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरकारी जागेत शेड बांधण्याचे काम चालले होते. यावेळी सरपंच मनीषा वाघ, ग्रामसेवक शोभा जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित असताना अतिक्रमण कोणी केले हे पाहण्यासाठी गेले असता अतिक्रमणधारकांनी शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अनिल श्यामराव वाघ, गौरव अनिल वाघ, अशोक श्यामराव वाघ यांच्याविरुद्ध भिगवण पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यात आली आहे.
भिगवण-राशीन रोडलगत तक्रारवाडी गावामध्ये अनेकांनी अतिक्रमण केले असून, याबाबत अनेक वेळा ग्रामसभेत हा विषय चर्चेसाठी घेतला असता खडाजंगी होत असून, अनेक वेळा भांडणे होत आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा उपोषण करून वेळोवेळी याबाबत आवाज उठविला. परंतु, दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ झाली. मात्र, अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.