पुणे : पीएमआरडीएच्या पुणेमेट्रो मार्ग - 3 चे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस 2019 अखेर पुण्यात 12 किलोमीटरपर्यंत मेट्रो धावेल, असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. कल्याण पाठोपाठ पुण्यातही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
''कोणत्याही शहराच्या विकासात पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाची असते. केंद्र सरकार मुख्यतः देशातील प्रमुख शहरांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. देशात २०० किलोमीटर मेट्रो लाईन प्रकल्प मंजूर केले आहेत, तर ३०० किलोमीटर मेट्रो लाईनचे प्रकल्प प्रस्थावित आहेत. डिजिटल इंडियासाठी बनवण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल सुरू आहे. मोबाइल तयार करण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. हे यश मागील काही वर्षांतील मेहनतीचे फळ आहे. येणाऱ्या काळात मेट्रोलाईन देशातील प्रमुख शहरांची लाइफलाइन होणार आहे. शिवाय, मेट्रोच्या कामामुळे वेळ, पैसा वाचून तरुणाची कार्यक्षमता वाढणार आहे.'', असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
(Narendra Modi on Maharashtra Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो-3चं भूमिपूजन)
छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, महात्मा फुले, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचाही आपल्या भाषणात मोदींनी उल्लेख केला.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हिंजवडी पुण्याच्या विकासात मोठे स्थान आहे. मात्र येथे काम करणाऱ्या आयटीतील तरुणांचा वाहतूक कोंडीमुळे बराच वेळ जात आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. ती दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही मेट्रो लाईन ३ प्रकल्प हाती घेतला आहे. पीपीप तत्त्वावरील ही देशातील पहिलीच मेट्रो विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल. सक्षम आणि वेळ, पैशाची बचत यातून होणार आहे. मागच्या सरकारने अंतर्गत वादामुळे पीएमआरडीएकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुण्याचा विकास रखडला होता. मात्र आता आम्ही पीएमआरडीएचे विविध प्रकल्प मार्गी लावत आहोत. रिंगरोड, टाऊन प्लॅनिंगची कामे प्रगती पथावर आहेत.