पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वेबमेल हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्या जाणे, दिग्दर्शक नागराज मंजुळे यास बेकायदेशीरपणे मैदान भाडयाने देणे, माहिती अधिकाराची योग्यप्रकारे अंमलबजावणी न करणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सवात विद्यार्थ्यांनी सहभागी न होण्याचे परिपत्रक, शाकाहारी विद्यार्थ्यांनाच सुवर्णपदक देण्याची वादग्रस्त अट, आदी शिक्षणबाहय घटनांच्या गदारोळात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे पहिले वर्ष संपले आहे. केंद्र शासनाकडून विद्यापीठाला स्वायत्तेचा दर्जा मिळणे, एनआरएफमध्ये एका अंकाने वरची रँकिंग आदी सकारात्मक बाबी या काळात घडल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमळकर यांच्या नियुक्तीला गुरूवारी एक वर्ष पूर्ण झाले. एमएचा विद्यार्थी ते प्राध्यापक अशी सलग ३५ वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच घालवलेल्या डॉ. करमळकर यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांना विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांची चांगली माहिती असल्याने, ते सोडविण्याच्या दृष्टीने दमदार पावले उचलली जातील अपेक्षा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त करण्यात आली होती. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना विद्यापीठाचे मैदान भाडयाने देण्याचा कुलगुरुंचा निर्णय सर्वाधिक वादग्रस्त ठरला. कायद्याचे उल्लंघन करून मंजुळे यांना मैदान भाडयाने देण्यात आले. सुरूवातीला ४५ दिवसांसाठी मैदान भाडयाने दिले असताना ६ महिने उलटले तरी अद्याप चित्रपटाचा सेट मैदानावर जैसे थे आहे. विद्यापीठाचा वेबमेल हॅक करून इंजिनिअरींगच्या दोघा विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका फोडल्याचा गंभीर प्रकार नुकताच उजेडात आला आहे. यापार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेतील या त्रुटी दूर करण्याचे आव्हान कुलगुरूंसमोर आहे.
शिक्षणबाहय घटनांच्या गदारोळात सरले कुलगुरूंचे पहिले वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 9:16 PM
विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांची चांगली माहिती असल्याने, ते सोडविण्याच्या दृष्टीने दमदार पावले उचलली जातील अपेक्षा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त करण्यात आली होती.
ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : कुलगुरूंच्या कार्यकाळाची वर्षपूर्ती आरोग्य केंद्राची दुरावस्था दूर करण्याचे काम अंतिम टप्प्यात प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्यावर भर