जेजुरी पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, जेजुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये नीरेत दि.१ एप्रिल रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी दोन महिला वैशाली संजय काशीद (वय ४२) व सुनीता बाळनाथ मोराळे (वय ३६) जात होत्या. तशा त्या अनेक दिवसापासून एकत्र मॉर्निंग वॉक घेत असतात त्या दोन महिलांना विना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाची कार जोरदार ठोकर दिली. त्या धडकेमुळे त्या दोघी जबर जखमी झाल्या त्या दोघींना बेशुद्ध स्थितीमध्ये लोणंदच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दि. ४ रोजी त्यातील महिला वैशाली काशीद हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी महिला सुनीता मोराळे या अद्यापही बेशुद्ध अवस्थेमध्ये रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पोलिसांनी पंचनामा करून त्यातील पुरावे गोळा करून गाडीत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे व भौतिक पुराव्यावरून गाडीचा चालक संकेत राजू होले (वय २३) रा. गोपाळवाडी (ता. दौंड) याला ताब्यात घेतले. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे व्यवस्थित चौकशी केली असता त्याने हा अपघात रणजीत सुशांत जेधे (रा. नीरा )यांनी करावयास सांगितला असल्याचे कबुल केले. सुनीता मोराळे या किरण जेधे यांच्या कुटुंबीयांना त्रास देत असल्याने त्यांना मारण्यासाठी रणजीत जेधे याने सांगितले. दि. १ एप्रिल रोजी सकाळी नेहमीप्रमाणे सुनीता मोराळे त्यांच्या मैत्रिणी सोबत चालण्यासाठी निघाल्या. त्यावेळेस रणजीत जेधे याने आरोपी संकेत होले याला सुनीता मोराळे यांना लांबून दाखवले. त्यानंतर आरोपी संकेत होले याने सुनीता मोराळे यांना जीवे मारण्यासाठी त्याची काळ्या रंगाची कार त्यांच्या अंगावर घातली परंतु त्यावेळेस चालताना काशीद या सुद्धा त्या धडकेमध्ये सापडल्या दोघी ही बेशुद्ध झाल्या.
रणजीत जेधे व संकेत होले यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यामध्ये किरण सुमंत जेधे यांचा सुद्धा कटात सहभाग असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आले. त्याच बरोबर सुनीता मोराळे यांच्या नातेवाईकांनी ही तक्रार केली आहे की, सुनीता मोराळे व किरण जेधे यांचे दीड ते दोन वर्षापासून विवाहबाह्य संबंध होते व त्या मधून त्या दोघांचे वाद होत होते म्हणून सुनीता मोराळे यांना मारण्याचा कट किरण जेधे यांनी केला असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. तांत्रिक पुरावा व साक्षीदारांच्या जबान्या वरून किरण जेधे यांना सुद्धा या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. यातील आरोपी रंजीत जेधे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संकेत होले व किरण जेधे यांना सासवड न्यालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. या गुन्ह्यातील कलमात वाढ करण्यात आली आहे अशी माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.
या गुन्ह्याचा तपासात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत. या कारवाई मध्ये पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, कैलास गोतपगार, पोलीस हवालदार मोकाशी, कुतवळ, राजेंद्र भापकर, सुदर्शन होळकर, पोलीस नाईक कदम पोलीस नाईक अक्षय यादव, पोलीस शिपाई शेंडे यांनी महत्वाची भूमिका निभावली.