पुणे : पुणे व पिंपरी शहरातून विनाप्रक्रिया केलेले मैलापाणी नदीत सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या १२१ गावांना दूषित पाणीपुरवठा होत होता, त्या ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत देण्यात आलेल्या निर्देशानुसार पुणे महापालिकेकडून ६ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडून निधीचा धनादेश बुधवारी स्वीकारला.यामुळे या प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार असून या गावांना मे अखेर शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे कांतीलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नदीत सोडण्यात येत असलेल्या मैलापाण्यामुळे नदीकाठच्या गावांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर नदीतील हेच पाणी उजनी धरणामध्ये जाऊन मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यातसुध्दा अशुध्द पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. विधीमंडाळामध्ये यावर शासनाला सातत्याने जाब विचारला जात होता. यातून मार्ग काढण्यासाठी ३ आॅगस्ट २०१० रोजी विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बाधित गावांमध्ये रिव्हर्स आॅसमॉसिसच्या (आरओ) माध्यमातून प्रतिमाणशी १० लिटर शुध्द पाणी उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्याचा खर्च पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा यांनी समसमान करावा असे आदेश देण्यात आले होते. (प्रतिनिधी)
मे अखेर नदीकाठच्या गावांना मिळणार शुद्ध पाणी!
By admin | Published: April 23, 2015 6:28 AM