पुणे : ‘सरल’ संगणकप्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी संकेतस्थळ सुरूच राहणार असले, तरी संचमान्यता मात्र सोमवार (दि. २३) पर्यंत भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारेच केली जाणार आहे. अद्यापही अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती भरली न गेल्याने संचमान्यतेवर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.राज्यातील विद्यार्थ्यांची सर्व माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने ‘सरल’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर टाकण्यात आली आहे. या माहितीच्या आधारेच शिक्षकांची संचमान्यता केली जाणार आहे. त्यामुळे मुदतीत माहिती भरण्यासाठी सर्वच शिक्षकांची धावपळ सुरू होती. मात्र, सुरुवातीपासूनच या प्रणालीमध्ये माहिती भरताना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे माहिती भरण्यासाठी दि. ३० सप्टेंबरनंतर तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. सध्या २३ आॅक्टोबरपर्यंत माहिती भरण्यासाठी मुदत होती. या मुदतीत विद्यार्थ्यांची माहिती भरून होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, तांत्रिक अडचणी तसेचआधार कार्ड व शाळेकडीलमाहितीत तफावत असल्याने विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात अडथळेआले. विद्यार्थ्यांची माहिती अद्याप पूर्ण भरून झालेली नाही.शहराच्या मध्य वस्तीतील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप शाळेतील १० टक्के विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती भरली गेलेली नाही. आधार कार्डावरील माहितीमध्ये विसंगती असल्याने हे अडथळे येत आहेत. त्यामुळे ही माहिती भरण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळेल, असे अपेक्षित आहे. मुदतवाढ न मिळाल्यास संचमान्यतेत शाळेला फटका बसू शकतो. दरम्यान, ग्रामीण भागातील शाळांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. आधार कार्डावरील माहिती दुरुस्त करण्यास झालेला विलंब तसेच भारनियमनामुळे माहिती भरण्यात अडचणी आल्याचे शिक्षकांनी सांगितले. आता माहिती भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.>विद्यार्थ्यांची माहिती यापुढेही ‘सरल’वर भरता येणार नाही. ही लिंक सुरूच राहणार आहे. मात्र, संचमान्यतेसाठी सोमवारपर्यंत भरण्यात आलेली माहितीच ग्राह्य धरली जाणार आहे. - सुनील मगर,संचालक, विद्या प्राधिकरण
संचमान्यता सोमवारपर्यंतच, सरल संकेतस्थळ सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:55 AM